Viral Video: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर मन आपसूकचं शांत होऊन जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण मुलांना जंगलाची सफारी करायला घेऊन जातात. जंगलातील प्राणी, मुक्त उडणारे पक्ष, पानं-फुलं पाहून प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न फेर धरून नाचू लागतात. तसेच आयएफएस आणि आयएएस अधिकारी त्यांच्या पोस्टद्वारे जंगलातील प्राण्यांच्या, पक्षांच्या खास गोष्टी इतरांद्वारे शेअर करत असतात. जंगलातील वन्यजीवन, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे काही खास क्षण पोस्टद्वारे नेटकऱ्यांपर्यंत पोहचवत असतात. तर आज भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी हत्ती कुटूंबाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
कुटुंबात एखाद लहान बाळ असेल तर त्याला प्रत्येक गोष्टीसाठी पाहिलं प्राधान्य दिल जाते. त्याला पहिला जेवण भरवून घेणे ते सगळ्यात आधी त्याला झोपवून, घरातील सगळी कामे आवरून मग आपण निवांत झोपून जातो ; असे आपल्यातील अनेक जण करतात. तर आज व्हायरल व्हिडीओत सुद्धा असंच काहीस पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओ तमिळनाडूचा आहे. जंगलात एक हत्ती कुटुंब निवांत झोपलेलं दिसत आहे व एका छोट्याश्या हत्तीच्या पिल्लाचे अगदीच अनोखं संरक्षण करताना दिसत आहेत. जंगलात निरागसपणे झोपलेलं हत्ती कुटुंब तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जंगलात हिरव्यागार शेताच्या मधोमध हत्तीचे पिल्लू झोपलं आहे. तसेच त्याला Z प्लस सुरक्षा दिली जाते आहे. त्याची सुरक्षा करण्यासाठी हत्ती कुटुंब त्याच्याभोवती वर्तुळाकार झोपलेलं दिसून येत आहे. मध्येच एक हत्ती उठून हत्तीचे पिल्लू नीट झोपी गेलं आहे का याचा तपास देखील करतो आहे. वन्यजीव छायाचित्रकार धनू पराण यांनी टिपलेला हा १५ सेकंदांचा व्हिडीओ एका सुंदर हत्ती कुटुंबाचे प्रदर्शन करतो आहे ; जे पाहून तुम्हाला तुमच्या कुटुंबाची नक्कीच आठवण येईल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @supriyasahuias आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी रिपोस्ट केला आणि लिहिलं की, ‘तामिळनाडूमधील अनामलाई व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात एक सुंदर हत्ती कुटुंब आनंदाने झोपलेले आहे. हत्तीच्या बाळाला कुटुंबाकडून Z प्लस सुरक्षा दिली जाते आहे. हे आपल्या कुटुंबांसारखेच आहे ना? ; अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. तसेच सोशल मीडियावर हे हत्ती कुटुंब अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे व नेटकरी व्हिडीओ पाहून विविध कमेंट करताना दिसून येत आहे.