नाश्त्यासाठी सर्वाधिक दक्षिण भारतीय पदार्थ पसंत केले जातात. जसे की, पोहे, उपमा, इडली, मेदूवडा, डोसा, शिरा, उत्तप्पा हे पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम पर्याय तर आहेतच; पण ते पचायलाही हलके असतात. बाहेर फिरायला गेलो तरी एखाद्या हॉटेलात जाऊन अशा हेल्दी; पण तरीही चटपटीत अशा या पदार्थांवर आपण ताव मारतो. पण, आज सोशल मीडियावर एक खास गोष्ट पाहायला मिळाली आहे. एका खास टीमने जगातील सगळ्यात मोठा डोसा बनवून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वतःचे नाव कोरले आहे
बंगळुरूच्या ७५ शेफनी (Chef) मिळून हा जगातील ‘सर्वांत लांब डोसा’ बनविला आहे. शेफ रेगी मॅथ्यू आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने एमटीआर फूड्सने ही उत्तम कामगिरी केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद बंगळुरू येथील एमटीआर फॅक्टरी येथे १५ मार्च २०२४ रोजी करण्यात आली. या खास उपक्रमाला @lormangroupofcompany, M S Ramaiah कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा योगदान दिले आहे. एकदा पाहाच हा जगातील सगळ्यात लांब डोसा.
व्हिडीओ नक्की बघा :
जगातील हा सर्वांत लांब डोसा बनविताना फक्त ७५ शेफ नाही, तर अन्नतज्ज्ञ आणि स्वयंपाकासंबंधीच्या बंगळुरू शाळेतील काही कर्मचारी सामील झाले होते. यापूर्वी त्यांनी हा डोसा बनविण्यासाठी १०० वेळा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्यांचा हा १०१ वा प्रयोग यशस्वी झाला आहे. १२३.०३ फूट डोसा बनविण्याचा हा व्हिडीओ शेअर करताना शेफ मॅथ्यू यांनी, “एमटीआर यांचा १०० वा वर्धापनदिन होता. तसेच या वर्धापन दिनानिमित्त १२३.०३ फूट उंचीचा सर्वांत लांब डोसा बनवून त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सबरोबर हा दिवस अभिमानाने साजरा केला आहे”, अशी कॅप्शन दिली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chefregimathew या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही जगातील सर्वांत मोठा डोसा कशा प्रकारे बनवला जात आहे ते पाहू शकता. काही नेटकरी हा व्हिडीओ पाहून या एमटीआर ग्रुपचे कौतुक करताना; तर काही जण या अनोख्या गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड्सबद्दल शेफ आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.