सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात काही जण दुसऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खोट्या नावांचा वापर करतात. सध्या उत्तर प्रदेशातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका तरुणाने आपली खरी ओळख लपवत एका अल्पवयीन मुलीची फसवणूक केल्याचा आरोप काही हिंदू संघटनांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील हॉटेलमधून एका तरुणाला पकडण्यात आलं आहे. कारण या मुलाने स्वत:चं नाव बदलून अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये आणल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी तरुणाला रुम देण्यास नकार दिला. त्यानंतर चौकशीत या मुलाने सोशल मीडियावर अनेक फेक आयडी बनवल्याचंही उघडीस आलं.
या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनेच्या लोकांनी घटनास्थळी पोलिसांना बोलावलं आणि मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर आरोपी तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांसह घऱी पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. अमरोहा येथील रहिवासी असलेल्या मुलीशी इंस्टाग्रामवर बनावट आयडीद्वारे तरुणाने मैत्री केल्याचंही उघडकीस आलं आहे. शिवाय या आरोपी तरुणाने पोलिसांना आपले खरे नाव इम्रान असल्याचं सांगितलं आहे.
हेही पाहा- लुडो खेळता खेळता जावयाचा सासूवर जडला जीव, अंधाऱ्या रात्री भेटायला जाताच गावकऱ्यांनी पकडला अन्…
हिंदू संघटनांच्या लोकांनी सांगितले, “इम्रानने राहुल गुर्जर नावाने इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर बनावट आयडी तयार केली आहेत. शिवाय फसवणूक झालेल्या मुलीने आरोपी तरुण राहुल गुर्जर नावाने इंस्टाग्रामवर भेटला असं सांगितलं. मात्र, त्याचे नाव इम्रान असल्याचं सत्य तिला नंतर समजलं. आरोपी तरुणाचा मोबाईल आम्ही पाहिला तेव्हा त्यात शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडीओ होते, मात्र सार्वजनिक केले नाहीत.” दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध विनयभंग आणि पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेचे वृत्त आजतक बेवसाईटने दिलं आहे.