बस, ट्रेन किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना लोकांना लाउडस्पीकरद्वारे किंवा बॅनर्सच्या माध्यमातून चोरांपासून सावध राहा, असे आवाहन केले जाते. कारण- अशा ठिकाणी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यावेळी अनेक प्रवाशांच्या बॅग किंवा खिशातून महागडे मोबाईल फोन, दागिने, पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्या जातात. पण, आता मेट्रो स्थानकावरही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एका मेट्रो प्रवाशाच्या बॅगमधून चोर कशा प्रकारे बॅगमधील पैशांची पर्स कशाप्रकारे चोरी करून पसार होतात याचा एक लाइव्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रो स्थानकावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आले की, दोन महिला चोर योग्य संधीची वाट पाहून चोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्याने त्या महिला काय करतात हे पाहण्यासाठी म्हणून व्हिडीओ रेकॉर्डिंग ऑन केले. यावेळी मेट्रोमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत, त्या महिला चोरांनी सहजरीत्या एका महिला प्रवाशाच्या बॅगमधील पैशांची पर्स काढली आणि तिथून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्या महिला चोरांची ही हातचलाखी त्या व्यक्तीच्या लाइव्ह रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड होत होती. महिला चोर पर्स काढून पळून जाणार तितक्यात व्हिडीओ काढणारी व्यक्ती संबंधित महिला प्रवाशाला सांगते की, तुमच्या बॅगमधील पैसे चोरीला गेले लवकर खाली उतरा. त्यानंतर ती महिला ट्रेनमधून उतरते आणि महिला चोरांकडून तिची पैशांची पर्स परत घेत त्यांना मारते. चोरीची ही घटना पाहून तुम्हालादेखील मेट्रोतून प्रवास करताना किती व कशी सावधगिरी बाळगली पाहिजे ते लक्षात येईल. हा व्हिडीओ दिल्ली मेट्रो स्थानकातील असल्याचे व्हिडीओत सांगण्यात आले आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले- पूर्वी ते पैसे मागायचे. आता त्यांची नोकरीही अपग्रेड झाली आहे. आणखी एका युजरने लिहिले- दिल्ली मेट्रोमध्ये काही ना काही घडतच असते.