पद्मनाभस्वामी, तिरूपती, शिर्डी, वैष्णोदेवी, सिद्धिविनायक, जगन्नाथ मंदिर, सूवर्ण मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत जी भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूर दूरुन येतात. देवाच्या चरणी नतमस्तक होतात. फूले, हार, नैवैद्य भक्तिभावाने देवाच्या चरणी अर्पण करतात. देवाच्या दानपेटीत लाखोंनी दान देतात, काही नवस फेडतात तर काही देवस्थानाला देणगी देतात. विशेष म्हणजे ही मंदिरे जरी आराध्य देवांसाठी प्रसिद्ध असली तरी त्यांच्या आर्थिक उलाढालींसाठी ही प्रसिद्ध आहे. या मंदिरांकडे इतकी संपत्ती आहे की ही संपत्ती गरिबांना वाटली तर त्यांचे भविष्य नक्की सुधारू शकेल. भारतातील अशाच श्रीमंत मंदिरांविषयी ज्यांच्या संपत्तीचा आकडा ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल !

पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ :  हे भारतातीलच नाही तर जगातील सगळ्यात श्रीमंत हिंदू मंदिर मानले जाते. केरळमध्ये असलेल्या या मंदिराकडे जळपास वीस बिलियन डॉलर म्हणजे १ लाख ३६ हजार कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
तिरुमाला तिरुपती व्यंकटेश्वरा मंदिर, आंध्रप्रदेश  : आंध्रप्रदेशमध्ये असणारे तिरुपती बालाजी मंदिर हे दुस-या क्रमांकावर आहे. फक्त लाडूंचा प्रसाद विकूनच या मंदिराला ७५ कोटींहून अधिक उत्पन्न मिळते तर वर्षाला ६०० कोटींहून अधिक रकमेची देणगी या मंदिराकडे येते.
शिर्डी साई बाबा मंदिर, महाराष्ट्र : भारतातील श्रीमंत मंदिराच्या यादीत शिर्डी देवस्थान तिस-या क्रमांकावर आहे. या मंदिराला वर्षाला ३६० कोटींच्या आसपास देगणी येते.
वैष्णो देवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर : सर्वाधिक भेट देणा-या या मंदिरांच्या यादीत वैष्णो देवीचे मंदिर हे दुस-या क्रमांकावर येतात. दरवर्षी लाखो भाविक वैष्णो देवीच्या चरणी येतात. यातून मंदिराला ५०० कोटींचा नफा मिळतो.
सिद्धिविनायक मंदिर, महाराष्ट्र : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर या यादीत पाचव्या क्रमांकावर असून या मंदिराकडे ४८ ते १२५ कोटींच्या आसपास संपत्ती आहे.