‘फोर्ब्स’ने काही दिवसांपूर्वी जगातील अब्जाधीशांची यादी जाहिर केली होती. यात रिलायन्स इंण्डस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. पण त्याचबरोबर फोर्ब्स मासिकाने भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी देखील जाहिर केली होती. या यादीत मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर आहेत. चीन आणि अमेरिकेनंतर जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत भारत हा तिस-या क्रमांवर आहे. विशेष म्हणजे या यादीमधल्या भारतीयांची नावे ही वाढत आहेत. यंदा भारतातील अतिश्रीमंताच्या यादीत १११ अब्जाधीशांचा समावेश आहे. २०१४ मध्ये यातले अनेक जण कोट्यधीश होते पण २०१६ मध्ये यातल्या अनेकांचा सहभाग अब्जाधीशांच्या यादीत झाला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये पाच व्यक्ती अशा आहेत ज्यांचे एकूण उत्पन्न हे अनेक देशांच्या जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नांपेक्षाही अधिक आहे. यावरून तुम्ही त्यांच्या श्रीमंतीची कल्पना करू शकता. भारतातील मुकेश अंबानी, दिलीप संघावी, अझीम प्रेमजी, पलोनजी मिस्त्री यांची संपत्ती ही अनेक गरीब आणि विकसनशील देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही जास्त आहे.
भारतातील अब्जाधीश
मुकेश अंबानी : फोर्ब्सच्या यादीप्रमाणे भारतातील श्रीमंत व्यक्तीमध्ये मुकेश अंबानी यांचे स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे २६ अब्ज डॉलर म्हणजे १.७८ लाख कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. अनेक आफ्रिकेतील देशांच्या जीडीपीपेक्षा त्यांचे उत्पन्न अधिक आहे.
दिलीप संघवी : फोर्ब्सच्या यादीत दुस-या क्रमांकावर आहेत सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी त्यांच्याकडे १८ अब्ज डॉलर म्हणजे १.२३ लाख कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
पालोनजी मिस्त्री : पलोनजी शपूरजी समूहाचे पालोनजी मिस्त्री यांच्याकडे ८९, १२८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
अझीम प्रेमजी : फोर्ब्सच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांच्याकडे ५२,७९१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची संपत्तीही मोजाम्बिक देशाच्या एकूण जीडीपीपेक्षाही अधिक आहे.