करोना व्हॅक्सिनच्या १७०० लसी घेऊन पोबारा केलेल्या चोराला पश्तात्ताप झाला असून त्यानं या लसी परत केल्या आहेत. सोबत चोरी केलेला माल म्हणजे करोना लसी होत्या हे माहित नव्हतं अशी चिठ्ठी ठेवली आहे. हरयाणा मधल्या जिंदमध्ये गुरूवारी एका चोराने हॉस्पिटलमधल्या १७०० लसी चोरल्याची घटना घडली होती. “माफ करा, करोनाशी संबंधित लसी यामध्ये होत्या याची मला कल्पना नव्हती,” असं त्या चोरानं चिठ्ठीमध्ये म्हटलंय. कोवॅक्सिन व कोविशिल्ड या लसींनी भरलेली पिशवी या चिठ्ठीसोबत चोरानं परत हॉस्पिटलमध्ये सोडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या चोराचा शोध घेत आहेत. काल, गुरुवारी दुपारच्या सुमारास जिंद मधील सिविल लाइन हॉस्पिटलच्या बाहेरच्या चहाच्या टपरीवर एका माणसाकडे ही पिशवी दिली. यामध्ये पोलिसांसाठी खाद्यपदार्थ असून मला अत्यंत तातडीच्या कामासाठी जायचं असल्याची विनंती त्या व्यक्तिनं संबंधित माणसाकडे केली. त्यानंतर हा सगळा उलगडा झाला.

वाचा मूळ बातमी: चोरट्यांनी लसीचे १७१० डोस केले गायब! रोख रकमेला हातही लावला नाही!

कदाचित चोर रेमडिसिविर चोरण्यासाठी आला असावा, परंतु त्यानं चुकून लसी चोरल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या करोनाग्रस्त भारतात लसी, रेमडेसिविर व ऑक्सिजनसारख्या करोनाविरुद्धच्या शस्त्रांचा तुडवडा असून अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे. त्यामुळे लस चोरण्यासारख्या घटना घडल्यावर खेद व आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. मात्र, चोरानं पश्चात्ताप झाल्यानं या लसी परत केल्यामुळे सुखद धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

Story img Loader