सोशल मीडिया हा जणू आपल्या ‘लाईफस्टाईल’चा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टींचे अपडेट सोशल मीडियावर देणे हा अनेकांच्या सवयीचा भाग होत चालला आहे. पण सोशल मीडिया म्हणजे आपले सगळेच आयुष्य सार्वजनिक करणे असे होत नाही. त्यामुळे फेसबुक, ट्विटर असो किंवा आणखी काही माध्यमे यावर सक्रिय असताना काही गोष्टी करणे आर्वजून टाळा. तुम्ही या गोष्टी जितक्या टाळाल तितकेच तुमच्या फायद्याचे ठरेल.
स्टेटस – सोशल मीडियावर सक्रिय असणारा सर्वाधिक युजर्स हा तरुण वयोगटातला आहे. त्यामुळे साहजिकच वारंवार स्टेटस अपडेट करणे हे होणारच. पण स्टेटस अपडेट करताना पहिली गोष्ट म्हणजे तुमचे प्रेमभंग किंवा प्रेमप्रकरणांच्या अपडेट सोशल मीडियावर मांडण्याची गरज नाही. प्रत्येकाला चर्चेसाठी नवा विषय हवा असतो. त्यामुळे आपली स्टेटस ही कोणाच्या नकारात्मक चर्चेचा विषय तर बनत नाही याचे भान राहू द्या.
अवाजवी माहिती- स्वत:बद्दलची अवाजवी माहिती सोशल मीडियावर पुरवणे हे कधीतरी तुम्हाला संकटात नेऊ शकते. बरेचदा अनेकांच्या अकाऊंटमध्ये अनोळखी व्यक्ती देखील अॅड असतात. त्यामुळे आपण कुठे राहतो, आपला स्वभाव, नेहमी जाण्या -येणाच्या जागा यांसारख्या गोष्टींची अपडेट करणे टाळा.
खासगी फोटो – सोशल मीडियावर फोटो प्रत्येक जण अपलोड करतात, पण हे फोटो कोणत्या प्रकारचे असावे हेही प्रत्येकाने लक्षात घ्यावे. आपले खासगी फोटो शक्यतो कितीही मोह झाला तरी ते अपलोड करणे टाळा.
वैयक्तिक मते – प्रत्येकाला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, त्यामुळे व्यक्त होणे प्रत्येकाचा अधिकार आहे पण आपण कशाप्रकारे आणि कुठे व्यक्त होत आहोत याचेही भान प्रत्येकाला असणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे आपली कंपनी, त्यातील लोक यांच्याबद्दल थेट आणि वैयक्तिक मते शक्यतो अशा माध्यमातून देणे टाळा.
क्रिएटीव्ह काम – तुमचे क्रिएटिव्ह काम म्हणजे एखादा फोटो, ग्राफिक्स, चित्र ज्यावर तुम्ही कॉपीराईट किंवा वॉटर मार्क टाकला नसेल अशा गोष्टी सोशल मीडियावर अपलोड करणे टाळा. कारण या गोष्टींचा कोणी गैरफायदा घेऊ शकतो. तुमची क्रिएटिव्ह कल्पना इतरही कोणी वापरू शकतो. त्यामुळे उत्साहाच्या भरात त्या सोशल मीडियावर शेअर करू नका.
मौल्यावान वस्तू – तुमच्या घरातील मौल्यवान वस्तू, दागदागिने, पैसे यासारख्या गोष्टींचे फोटो अपलोड करणे टाळा. प्रत्येकाला शोऑफ करण्याची आवड असते पण तरी असा मोह तुम्हाला संकटात नेऊ शकतो.
जिओलोकेशन / चेकइन – आजकाल आपण कुठे जातो कुठे आहोत अशा ठिकाणीची माहिती म्हणजेच लोकशन देखील टाकण्याचा ट्रेंड आला आहे. पण अशा प्रकारची माहिती शेअर करणे देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतात. तेव्हा स्वत:च्या सुरक्षेची खबरदारी घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा