आयुष्याचा जोडीदार निवडताना प्रत्येक जण त्या जोडीदारात काही ना काही वेगळे शोधत असतो. कोणाला आपला जोडीदार समजूतदार हवा असतो तर कोणाला कुटुंबियांवर भरभरून प्रेम करणारा तर कोणाच्या यापेक्षाही आणखी वेगळ्या अपेक्षा असतात. आपापल्या अपेक्षेला प्राधान्य देऊनच मग तो जोडीदाराची निवड करतो. पण या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की जोडप्यात भांडणे, रुसवे फुगवे येतात. कधी कधी ही भांडणे ही काही काळापुरता असतात पण नंतर मात्र ही भांडणे टोक गाठतात. तेव्हा प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न असो ते करण्याआधी ऐकमेकांच्या आशा अपेक्षा एकमेंकासोबत बोलणेही तितकेच गरजेचे असते.
वाचा : ..म्हणून महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न करणे उत्तमच
कारण जर एकमेकांच्या अपेक्षा समजल्यात तरच पुढे होणारे कितीतरी त्रास कमी होतील. तुमचे लग्न ठरले असेल किंवा लग्नाचा विचार तुम्ही करत असाल तर त्याआधी काही गोष्टींची चर्चा तुमच्या जोडीदारासोबत आधी करणे आवश्यक आहे. यामुळे पुढे होणा-या समस्या टळतील हे नक्की. जोडीदारासोबत लग्न ठरताना नक्की कोणत्या गोष्टींची चर्चा करावी यासाठी तुम्हाला अनेक पर्याय वेगवेगळ्या वेबसाईट्सवर दिसतील यातील काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात.
चर्चेसाठी कोणत्या मुद्दांना प्राधान्य द्याल.
घर : विभक्त कुटुंबपद्धीत किंवा एकुलते एक असल्याने पटकन खूप लोकांमध्ये मिळून मिसळून राहणे बरेचदा दोघांना शक्य नसते. काही वेळा तिला किंवा त्याला प्रायव्हसी देखील तितकीच गरजेची असते. त्यामुळे, लग्नानंतर कुठे राहायचे, कोणासोबत राहायचे, कसे राहायचे या सगळ्या गोष्टींवर चर्चा करा. घरात काही नियम असतात त्याची कल्पना आधिच जोडीदाराला द्या. जेणेकरुन पुढे याच गोष्टींवरून भांडणं होणार नाही.
स्वभाव: आपला स्वभाव, आपल्या आवडी निवडी एकमेकांसोबत शेअर करा, प्रेमविवाहात या गोष्टी जोडीदाराला आधीच माहिती असतात पण ठरवून लग्न करताना या गोष्टींची पूर्वकल्पना एकमेकांना देणे गरजेचे आहे. यामुळे पुढे होणारी टोकाची भांडणे टळू शकतील त्याचप्रमाणे तुमच्या घरच्यांच्या आवडी निवडी स्वभाव देखील तिला किंवा त्याला समजून सांगा.
करिअर : लग्न झाल्यानंतर दोघांच्याही करिअरमध्ये याचा अडथळा येता कामा नये याची एकमेकांना हमी देणे तितकेच गरजेचे आहे. आपले काम काय आहे, कामाची वेळ, कामाचे स्वरूप या सगळ्यांची कल्पना घरातल्यांना द्या. यामुळे दोघांच्याही करिअरवर याचा परिणाम होऊ देऊ नका.
खर्च : लग्नानंतर दोघांवरही जबाबादारी पडते. तेव्हा लग्नाआधीचा उधळपट्टीची सवय यानंतर पुढे सुरू ठेवणे दोघांनाही परवडणारे नसते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर घरखर्च, बतच कशा प्रकारे केली जाणार आहे यावरही चर्चा करा. आपल्या पगाराची आणि बँक खात्यात असणा-या बचतीची पूर्वकल्पना एकमेकांना द्या.
फॅमिली प्लॅनिंग : हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग बद्दल चर्चा करा. जबाबदारी वाटून घेणे : दोघंही कामानिमित्त बाहेर जातात. तेव्हा घरी आल्यानंतर एकट्यावर जबाबदारी पडण्याऐवजी दोघांनी आपापली कामे वाटून घेण्याचे ठरवा.
पारदर्शकता : कोणतही नाते टिकवण्यासाठी दोघांमधला विश्वास आणि पारदर्शकता तितकिच गरजेची आहे. त्यामुळे नव्या नात्याला सुरुवात करण्याआधी आपल्या बद्दलची खरी माहिती कोणतीही आडकाठी न ठेवता द्या. भविष्यातील नात्याचा पाया हा आधी मजबूत करा, कारण या गोष्टी लग्नानंतर मध्ये आल्याने कायमस्वरूपी नात्यात कटुता येण्याची शक्यता असते. त्यामुळे, अशावेळी दोघांनी समजूतदारपणा दाखवत एकमेकांच्या चूका समजून घ्या.