गणेश चतुर्थीच्या काळात अनेकांनी इको फ्रेंडली गणपती संकल्पनेला पसंती दिली. त्यामुळे शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मुर्त्या तर पाहायला मिळतातच पण त्याचबरोबर अनेकांनी कागद, भाज्या, फळे आणि खाद्यपदार्थ वापरून बाप्पाची रुपे साकारली आहेत. याबद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच पण याहूनही पलिकडे एक वेगळाच उपक्रम लुधियानाच्या हरजिंदर सिंग आणि सतिंदर सिंग यांनी केला आहे.
लुधियानामध्ये बेलफ्रान्स बेकर्स अँड चॉकोलेटर्स नावाची बेकरी आहे. या बेकरीत चॉकलेटचा गणपती बाप्पा साकारला आहे. बेल्जियन चॉकलेट आणि अन्य चॉकलेट वापरून तीन फुटांचा चॉकलेटचा बाप्पा साकारण्यात आला आहे. यासाठी जवळपास ४० किलोंचे चॉकेलेट वापरण्यात आले आहे. पण या बेकरीचे कौतुक करण्यासारखी गोष्ट पुढे आहे. या बेकरीमधल्या हरजिंदर सिंग आणि सतिंदर सिंग यांनी चॉकलेटच्या बाप्पांचे विसर्जन दूधात करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर चॉकलेट मिश्रीत हे दूध म्हणजेच चॉकलेट मिल्कशेक ते गरीब मुलांमध्ये वाटणार आहे. त्यांनी या चॉकलेटच्या गणपत्ती बाप्पाचा फोटो ट्विटरवर टाकला आणि आपल्या या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.
अर्थात या दोघांचा उपक्रम स्तुत्य असल्याने त्यांचे खूपच कौतुक होत आहे, त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाची दखल अनेक जण घेत आहे. इतकेच नाही तर प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी देखील त्यांची दखल घेतली आहे. प्रत्येक जण गणेशोत्सव साजरा करत असतो पण या दोघांनी चांगल्या करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करून या सणाचा आनंद द्विगुणित केला आहे असे कौतुक संजीव कपूर यांनी केले आहे.