शिकण्यासाठी वय गरजेचे नसते हेच एका आजोबांनी दाखवून दिले आहे. हे आजोबा ६९ वर्षांचे आहे. साधारण या वयात प्रकृतीने अनेक जण त्रस्त असतात पण केवळ शिकण्याची आवड आणि जिद्द यामुळे दररोज दोन तासांचा पायी प्रवास करत ते शाळेत जातात. नेपाळमध्ये राहणा-या या आजोबांचे नाव दुर्गे खामी आहे.
रोज सकाळी उठून ते जेवण बनवतात. त्यानंतर सुरु होते शाळेची तयारी. दप्तर भरणे, शाळेचा गणवेश घालून तयार होणे अशी त्यांची लगबग सुरु होते. अगदी शाळेतल्या मुलांसारखे मोजे, शर्ट, पँट, टाय आणि पाठीला दप्तर लावून दुर्गेचा शाळेचा प्रवास सुरू होतो. नेपाळच्या सँगजा खेड्यात ते राहतात. हिमालयाच्या कुशीत हे छोटेसे खेडे वसले आहे. घरापासून शाळेत पोहचायला त्यांना जवळपास १ तास २० मिनिटे लागतात. शाळेपर्यंत पोहचायची त्यांची वाट तशी बिकट आहे पण तब्यतेची कोणतीही कारणे न देता अगदी लहान मुलांसारखे ते मार्ग काढत शाळेत पोहचतात. १० ते ४ अशी त्यांच्या शाळेची वेळ. शाळेत शिकवणारे शिक्षकही त्यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहेत पण दुर्गेनां त्यांच्याकडून शिक्षण घेण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. नेहमी पहिल्या बाकावर बसून ते शिक्षकाने शिकवलेले सगळेच आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. खेळाच्या तासाला इतर मुलांसोबत ते फुटबॉल देखील खेळतात आणि घरी आल्यावर नियमीत गृहपाठ करून मगच झोपी जातात. हे आजोबा दहावीत शिकत आहे.

‘लहानपणी आपल्याला शिक्षणाचे महत्त्व समजले नाही. त्यावेळी शाळा लांब असल्यामुळे आपण शिक्षण घेतले नाही. पण आता शिक्षण किती गरजेचे आहे हे मला कळले आहे त्यामुळे वयाचा विचार न करता मी शाळेत पहिलीपासून शिक्षण घ्यायला सुरूवात केली’ असेही आजोबा सांगतात. शाळा संपल्यानंतर या आजोबांना पुढेही शिकायचे आहे. त्यांची ही प्रेरणादारी कहाणी ‘ग्रेट बीग स्टोरी’ने संपूर्ण जगासमोर आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा