गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड फक्त माणसाच्या नावावर आहे असे नाही तर आतापर्यंत जगातील कित्येक प्राण्यांच्या नावे गिनीज विश्वविक्रम आहेत. कोण्या एका मांजरीने उंच उडी मारली, कोणाची शिंगे मोठी आहे तर कोणाची उंची असे विविध प्रकारचे विक्रम प्राणीच काय पण पक्ष्यांच्या देखील नावावर आहेत. भारतातील एका हत्तीणीचा देखील आता या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश होऊ शकतो.
केरळचीची राजधानी तिरूअनंतपुरममध्ये दक्षयाणी नावाची ८६ वर्षांची हत्तीण आहे जी कदाचीत जगातील सगळ्यात जास्त आयुष्य जगणारी हत्तीण ठरू शकते. आयएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ही हत्तीण त्रावणकोर देवस्सम बोर्डच्या मालकीची आहे. या देवस्थानाकडे असणारी हत्तीण ही जगातील सगळ्यात वृद्ध हत्तीण असल्याचा दावा या बोर्डाने केला असून त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घ्यावी यासाठी या बोर्डाने पुढाकार घेतला आहे. त्रावणकोरच्या राजघराण्याने या संस्थेला ही हत्तीण दिली होती. केरळच्या अनेक सणांमध्ये हत्तीला महत्त्वाचे स्थान आहे. सध्या या देवस्थानाकडे ३३ हत्ती आहेत. त्यापैकी दक्षयाणी ही सगळ्यात वृद्ध हत्तीण आहे.