नुकतेच जर्नादन रेड्डीच्या मुलीचे लग्न पार पडले. या लग्नात त्यांनी थोडी थोडकी नाही तर तब्बल पाचशे कोटींची उधळपट्टी केली होती. लग्न समारंभावर होणारी उधळपट्टी भारतीयांसाठी काही नवा विषय नाही. या एका दिवसांच्या सोहळ्यावर लाखो, कोट्यवधी रक्कम खर्च करणारे अनेक आहेत. पण हा सारा खर्च टाळून औरंगाबादमधल्या श्रेया मुनोत या नववधुने ९० गरीब कुटुंबियांना घरांचे वाटप केले आहे.
मनोज मुनोत यांना आपल्या मुलीचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात साजरा करायचा होता. आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी ते लाखो रुपये खर्च करणार होते. पण एक दिवसांसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा त्यांनी ही रक्कम चांगल्या कामासाठी वापरण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. या लग्नासाठी खर्च करण्यात येणा-या रक्कमेतून त्यांनी गरिबांसाठी घरे बांधली. श्रेयाच्या लग्नादिवशी तिने आपल्या हातने या गरिबांना घरांच्या चाव्या दिल्यात.
औरंगाबादमधल्या ९० गरीब कुटुंबियांना श्रेया आणि तिच्या वडिलांनी राहायला मोफत घरे बांधून दिली. मनोज यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ६० ते ७० लाख रुपये खर्चण्याचे ठरवले होते. मात्र एक दिवसाच्या उधळपट्टीपेक्षा त्यांने ही रक्कम चांगल्या कारणासाठी वापरण्याचे ठरवले. श्रेयाने देखील आपल्या बाबांच्या निर्णयात त्यांची साथ दिली. ‘बाबांनी योग्य तोच निर्णय घेतला. गरिबांना हक्काचे घर देऊन त्यांचे मला आयुष्यातील सगळ्यात मोठ भेट दिली’. अशी प्रतिक्रियाही तिने एएनआय या वृत्त संख्येला दिली. दोन महिन्यांत ही घरे बांधण्यात आली आहेत.