तुम्ही कधी रेड्याला विस्की पिताना पाहिलंय का? नाही ना? मग हरयाणातल्या या रेड्याला पाहा. या रेड्याला चक्क विस्की पिण्याची सवय लागलीय. या रेड्याचा मालक नरेश कुमार यांनी स्वत: याबद्दल माहिती दिलीय. ‘सुलतान’ या नावानं गावात प्रसिद्ध असलेल्या या अवाढव्य रेड्याचं वजन आहे १ टन. तर उंची आहे ५ फूट ११ इंच. या रेड्याची किंमत २१ कोटी असल्याचं नरेश कुमार यांनी सांगितलं.
भारतात आढळून येणाऱ्या सर्वात चांगल्या प्रजातीचा हा रेडा आहे. त्यामुळे त्याची किंमतही अधिक आहे. सुलतानमुळे दर महिन्याला लाखोंचं उत्पन्न नरेश कुमार यांना मिळतं. विशेष म्हणजे अनेक स्पर्धांमध्येही या सुलतानने बक्षीसं जिंकली आहेत. सुलतान जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी नरेश यांच्या घराभोवती जमते. सुलतान घराबाहेर पडला की, अनेक जणांना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह अनावर होतो. नरेश रोज दिवसातून एकदा सुलतानला घेऊन फिरायला जातात.
‘बारक्रॉफ्ट अॅनिमल’ला नरेश यांनी दिलेल्या मुलाखतीत सुलतानला विस्की आवडते असा दावा केलाय. एवढंच नाही तर महागड्या ब्रँडच्या विस्की भरवतानाचे त्यांनी फोटोही दाखवले. सुलतानला विस्की आवडते असं जरी त्याचे मालक सांगत असले तरी अनेक प्राणिप्रेमींनी यावर टीका केलीय. त्याला विस्की भरवून त्याचा मालक त्याच्या तब्येतीशी हेळसांड करत असल्याची टीका अनेकांनी केलीय.