‘पिरेड लिव्ह’ देण्याची पद्धत आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये रुजू होण्यास सुरू झाली आहे. मासिक पाळीच्या काळात शारीरिक थकवा आणि दुखणे यासारख्या अनेक समस्यांमुळे महिला त्रस्त असतात त्यामुळे त्यांचा विचार करता पिरेड लिव्ह देण्याची पद्धत आता अनेक परदेशी कंपन्यामध्ये रुजू होत आहे. विशेष म्हणजे ब्रिटनस्थित ‘कोएक्झिस्ट’ या कंपनीने मासिक पाळीच्या दिवशी महिला कर्मचा-यांना सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे. पहिल्यांदाच इंग्लडमधल्या एखाद्या कंपनीमध्ये अशा प्रकारची सुट्टी देण्यात आली आहे. मासिक पाळीच्या काळात महिला आजारी असल्याचे कारण सांगून कार्यालयात अनुपस्थित राहतात. पण या सुट्ट्यांची ‘सिक लिव्ह’मध्ये गणना करण्यापेक्षा महिलांना वेगळी अशी ‘पिरेड लिव्ह’ देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. महिलांच्यादृष्टीने हा निर्णय अगदी महत्त्वाचा आहे. त्यामुळे महिला वर्गात या निर्णयाचे कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे ज्या कंपनीत अद्यापही अशा प्रकाराच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या नाहीत तिथेही त्या लागू करण्याचा विचार होत आहे.  कंपनीने या काळात महिलांना घरुन काम करण्याची मुभा देखील दिली आहे.