सध्या जपानच्या सोशल मीडियावर एका १७ वर्षांच्या शाळकरी मुलीचा फोटो खूपच व्हायरल झाला आहे. पहिल्या नजरेत एका सामान्य मुलीसारख्या दिसणा-या या मुलीने जवळपास सगळ्याच तरूणांना वेड लावले आहे. मानेपर्यंत आलेले सरळ केस, घारे डोळे, पांढरा शर्ट आणि गळ्यात टाय घातलेल्या या मुलीचा फोटो अनेकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. पण या फोटोमध्ये एक गंमत दडली आहे ती म्हणजे  फोटोत दिसणारी ही मुलगी खरी नाही. डिजीटलचे तंत्र वापरून जपानमधल्या एका जोडप्याने या मुलीची निर्मिती केली आहे. तेरोयुकी आणि युशी इशिकावा या दाम्पत्याने या डिजीटल मुलीची निर्मिती केली आहे. त्यांनी या मुलीला ‘साया’ असे नाव दिले आहे.
या दाम्पत्याने  सायाचा फोटो एका बेवसाईटवर शेअर केला. त्यामुळे फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी खरी की खोटी हे ओळखण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली. फार कमी वेळात सायाचा फोटो जपानच्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. ही मुलगी अस्तित्त्वात नसून ग्राफिक्स डिझाइन्समार्फत तयार करण्यात आली आहे यावर अजूनही कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. तेरोयुकी आणि युशी इशिकावा हे ग्राफ्किस डिझायनर्स असून एका शॉर्ट फिल्मसाठी त्यांनी सायाची निर्मिती केली. साया ही हुबेहुब मुलींसारखी दिसावी यासाठी या दोघांनी गेले कित्येक महिने तिच्यावर काम केले आहे. त्यासाठी त्यांनी आपली नोकरी देखील सोडली. सायाला मिळालेली इतकी प्रसिद्धी पाहून या दोघांची मेहनत आता फळाला आली असेच दिसते आहे.