या जगात माणुसकी राहिली नाही असे म्हणतात, पण काही लोक असेही आहेत जे ती टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. देशात गरीबी आहे, गरीबांसाठी काहीतरी करायला हवे असे सगळेच म्हणतात पण फार थोडे जण त्यांची परिस्थीती सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्या थोड्या थोडक्या लोकांमध्ये येतात अहमदाबादचे मोहित शहा. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदाबादच्या रस्त्यावर रोज गरीबांसाठी मोफत भाजीपाला आणि फळे वाटप करतात. ५४ वर्षांचे शहा आपली पत्नी आणि दोन मुलांच्या मदतीने हजारो टन भाजी गरीबांना वाटतात. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला आहे.

ही कल्पना त्यांना आपल्या पत्नीपासून मिळाली. दररोज शेकडो गरीब लोक पैसे नसल्यामुळे पोषक आहारापासून वंचित राहतात. म्हणून त्यांना सकस आहार मिळावा यासाठी शहा कुटुंब गरीबांना मोफत भाजी आणि फळे पुरवतात. रोज सकाळी आपल्या गाडीवर वेगवेगळ्या भाज्या लादून ते नवरंगपूच्या रस्त्यावर भाज्यांचे वाटप करतात. सुरूवातीला आठवड्याला फक्त २०० किलो भाज्यांचे वाटप ते करायचे. आज दरआठवड्याला १५०० किलो भाज्यांचे वाटप ते करतात. मोहित शहांची सिमेंटची कंपनी आहे. आपल्या नफ्यातील काही हिस्सा ते अशाप्रकाराचे गरीबांसाठी खर्च करतात.