सोशल मीडिया एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे उत्तम माध्यम आहे, पण सोशल मीडियाचा आणखी एक फायदा असा होता की त्यामुळे कलाकार, प्रतिभावंतांना देखील व्यासपीठ मिळते. त्यांचे कलागुण हे सातासमुद्रापार पोहचतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेले असेच एक छायाचित्र सध्या सगळ्यांना आश्चर्याने तोंडात बोटे घालायला भाग पाडत आहे. नवजात बालकाला आपल्या कुशीत कवटाळून शांत उभ्या असलेल्या आजीचा ते छायाचित्र आहे. या जगात पाऊल ठेवणारी नवी पिढी आणि जगाचा अनुभव घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली आधीची पिढी दोन पिढींमधले अंतर हे छाायाचित्र दाखवते. मायेची ऊब मिळाल्याने बाळही आजीच्या कुशीत शांत आहे आणि आजीने काळजाच्या तुकड्याला कवटाळून समाधानाने आपले डोळे मिटले आहेत. तसे पाहायला गेला तर तुमच्या आमच्यासाठी हे एक साधे छायाचित्र असेल पण या छायाचित्रात त्याच्या प्रसिद्धीचे खरे कारण दडलय. आता या छायाचित्राला इतकी प्रसिद्धी का मिळत असेल असा प्रश्न आपल्याही डोक्यात आला असेल. याच कारण असे आहे की या छायाचित्रात दिसणारे आजी आणि नातू हे खरे नाहीत तर हे केवळ एका पुतळ्याचे छायाचित्र आहे.
ऑस्ट्रेलियातल्या प्रसिद्ध अशा सॅम जिंक्स याने हा पुतळा बनवला आहे. २०१० साली बनवलेला हा पुतळा सोशल मीडियामुळे पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला आहे. हा पुतळा हायपर रिअॅलिस्टीक प्रकारत मोडतो. या पद्धतीत बनवण्यात आलेले मानवी पुतळे हे जीवंत माणसासारखेच वाटतात. सॅमने सिलकॉन, कॅल्शिअम कार्बोनेट यांसारखे अनेक घटक वापरून अशा पद्धतीने पुतळे बनवले जातात.