कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. शिवाय काही लोकं एका रात्रीत करोडपती बनल्याच्या अनेक बातम्या आपण सोशल मीडियावर पाहात आणि वाचत असतो. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रात्रीत एक दोन नव्हे तर तब्बल १३ हजार ३११ कोटींचा मालक बनला आहे. तर हा आकडा वाचून तुम्हालाच काय पण खुद्द ज्याला ही रक्कम मिळाली आहे, त्यालादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीबरोबर घडल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडामधील एका व्यक्तीने मेगा मिलियन्स लॉटरी जॅकपॉट जिंकला असून आता तो आता १.६ बिलियन डॉलर्स म्हणजे १३ हजार ३११ कोटी रुपयांचा मालक बनला आहे. या प्रकरणातील आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम जिंकलेल्या व्यक्तीने लॉटरीचे तिकीट फ्लोरिडा येथील जॅक्सनविलेतील एका पब्लिक्स सुपरमार्केटमध्ये इतर सामान खरेदी करताना घेतले होते. कारण तो केवळ लॉटरीचे तिकीट खरेदी करायचं असं ठरवून सुपरमार्केटमध्ये गेला नव्हता. तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच विजेत्या तिकीटांचे क्रमांक काढण्यात आलं होतं असंही आता सांगण्यात येत आहे.
अमेरिकेतील कायद्यानुसार, लॉटरी किंवा मोठी बक्षीस जिंकलेल्या विजेत्याचे नाव ९० दिवसांपर्यंत जाहीर केलं जात नाही. ते गुप्त ठेवलं जातं. तसेच फ्लोरिडातील हे प्रकरण खास ठरलं आहे. कारण अमेरिकेतील लॉटरीच्या इतिहासात ही तिसरी वेळ आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून जिंकली आहे. याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये एका व्यक्तीने २.४ अब्ज डॉलर्सचे बक्षीस जिंकले होते.
फ्लोरिडा प्रकरणातील विजेत्याला ही रक्कम एकरकमीच पाहिजे की टप्याटप्याने हे त्याला स्वत: ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु या लॉटरीच्या पैशाचा मोठा भाग कराच्या रूपात त्याला सरकारला द्यावा लागणार आहे. तर या विजेत्याने पैसे कोणत्या स्वरुपात स्विकारले आहेत. याबाबतची माहिती लॉटरी मालकांनी अद्याप सांगितलेली नाही. परंतु मागील प्रकरणं पाहता लॉटरीतील विजेते मिळालेल्या बक्षीसाची रक्कम एकरकमीच घेतात.