मुंबईमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तसेच जागोजागी वाहतूककोंडी झाल्याने अनेक वाहने रस्त्यांवर अडकून पडली. पावसाच्या पाण्यात आडकलेल्या अनेक वाहनांचे व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर दिवसभर व्हायरल होतं होते. या व्हिडिओंमध्ये एक व्हिडिओ होता तो म्हणजे पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमधून जाणाऱ्या फेरारी कारचा.
ट्विटवर एका युझरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक लाल रंगाची फेरारी पोर्टोफीनो गाडी खड्डे पडलेल्या रस्त्यांवरुन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नसली तरी काल मुंबई पडलेल्या पावसाच्या काळात हा अपलोड करण्यात आल्याने तो मुंबईचा असल्याचे बोलले जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमधून जाताना चालकाला खूपच कसरत करावी लागत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी चालक गाडी अगदी रस्त्याच्या कडेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तरीही गाडी खड्ड्यांमध्ये अडकत असल्याचे व्हिडिओत पहायला मिळते. परदेशी कंपनीच्या इतर गाड्यांप्रमाणे फेरारीचाही ग्राऊण्ड क्लियरन्स म्हणजेच गाडीचा खालील भाग आणि जमीनीमधील अंतर खूपच कमी असते. त्यामुळे खड्डे असणाऱ्या ओबडधोबड रस्त्यांवर अशा महागड्या गाड्या सहज चालवता येत नाहीत. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या युझरने कॅप्शनमध्ये ‘कधीच सरकारपेक्षा जास्त श्रीमंत होऊ नका’ असा टोला लगावला आहे. या गाडीची भारतातील किमान किंमत साडेतीन कोटी इतकी आहे.
Never get richer than the Government. pic.twitter.com/rpqoUKvjGl
— Godman Chikna (@Madan_Chikna) September 4, 2019
या व्हिडिओला ५० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याच व्हिडिओवर रिप्लाय करुन अनेकांनी ऐरोलीमधील पुलाखाली पाण्यात आडकलेल्या जॅग्वार गाडीचाही व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये गुडघाभर पाण्यात जॅग्वार गाडी अडकल्याचे दिसत आहे तर याच गाडीच्या बाजूने महिंद्रा बोलेरो गाडी सहज निघून जाताना दिसते.
Bolero vs Jaguar at Airoli (Navi Mumbai) today #MumbaiRains pic.twitter.com/Rl5KTjTVop
— Pawan Durani (@PawanDurani) September 4, 2019
दरम्यान बुधवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी खासगी गाड्या, बेस्ट बसेस अडकून पडल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री साडे दहानंतर रस्तेवाहतूक काही प्रमाणात सुरु झाली. तरीही काही ठिकाणी रात्री उशीरापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र पहायला मिळाले.