ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रविवारी एका धक्कादायक निकालाची नोंद करण्यात आली. ग्रीसच्या स्टेफानो त्सित्सिपास याने रॉजर फेडररचा पराभव केला. वयाच्या २० व्या वर्षी अशाप्रकारे फेडररसारख्या नामांकित खेळाडूला हरवणे ही मोठी कामगिरी समजली जात आहे. पण त्याचवेळी फेडररच्या पराभवाचं खापर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर फोडलं गेलं. आता यामध्ये विराट आणि अनुष्काचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

फेडररच्या पराभवानंतर सोशल मीडियावर विराट आणि अनुष्का चांगलेच ट्रोल झाले. यामागचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या विराट आणि अनुष्काने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनचे सामने पाहण्याचा आनंद लुटला. यावेळी विरुष्काने रॉजर फेडररची भेट घेतली. या भेटीदरम्यान तिघांनी एकत्र फोटोसुद्धा काढला आणि हा फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केला. या भेटीनंतर रविवारी फेडररचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. या दोन घटना लागोपाठ घडल्यामुळे विरुष्काला ट्रोल करण्याची आयती संधी ट्रोलर्सकडे चालून आली. ट्रोलर्सनी या संधीचा फायदा घेत विरुष्काला ट्रोल करणारे मिम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. विराट-अनुष्का हे ‘पनौती’ आहेत, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत ग्रीसच्या स्टेफानो त्सित्सिपास याने रॉजर फेडररचा ६-७, ७-६, ७-५, ७-६ पराभव केला. या स्पर्धेतील यशामुळे स्टेफानो हा उपांत्यपूर्व फेरीत जाणारा ग्रीसचा पहिला खेळाडू ठरलाय.

Story img Loader