माणूस आणि हत्ती यांच्यात असणारे घट्ट नाते दाखवणारा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. आपल्यावर जीव लावणा-या मालकाला बुडताना पाहून हत्तीच्या पिल्लाने चक्क नदीत उडी मारली आणि त्याला किना-यावर देखील आणले.
थायलंडमधल्या ‘एलिफंट नेचर पार्क’मध्ये जखमी झालेल्या हत्तींचे संवर्धन करण्यात आले आहे. येथील संस्थेचे सहसंस्थापक डॅरिक यांचे येथे राहत असलेल्या प्रत्येक हत्तीशी घट्ट नाते आहे. या हत्तींना नवे जीवनदान देण्यात डॅरिक यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे या नेचर पार्कमधल्या प्रत्येक हत्तींवर डॅरिकचा जीव आहे, विशेष म्हणजे या पार्कमध्ये असणा-या ‘खाम ला’ या हत्तीच्या पिल्लावर डॅरिकचा विशेष जीव आहे. या हत्तीच्या पिल्लालाही डॅरिकचा खूप लळा आहे. खाम आणि डॅरिक या दोघांमध्ये असलेल्या या मैत्रिच्या घट्ट नात्याचा हाच व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
नेचर पार्कमध्ये असलेल्या नदीत डॅरिक पोहत होता. पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहत जाताना खामने पाहिले आणि आपला मित्र बुडत आहे की काय असे वाटून कोणताही विचार न करताना हत्तीच्या या छोट्याशा पिल्ल्याने नदी उडी घेतली. पोहत जाऊन खामने आपल्या मित्राला वाचवले. डॅरिकला आपल्या दोन्ही पायांमध्ये धरून खामने त्याला किना-यावर आणले. खरेतर डॅरिक बुडत नव्हता पण आपल्यासाठी खाम काहीही करु शकते यावर मात्र त्याला विश्वास बसला.
यापूर्वीही खाम आणि इतर हत्तींची परिक्षा पाहण्यासाठी डॅरिक याने त्यांना आवाज दिला होता. विशेष म्हणजे डॅरिकचा आवाज ऐकून येथल्या हत्तींचा कळप त्याच्या मदतीला धावून आला होता आणि डॅरिकला पाहताच त्याच्याभोवती सुरक्षाकवच केले होते. तोही व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.
२०१५ मध्ये खामाला या पार्कमध्ये आणले होते. थायलंडच्या या नेचर पार्कमध्ये ७० हून अधिक हत्ती आहेत. यातील काहींना पिंज-यातून सोडवून आणले आहे तर काही जखमी हत्तींना मानवी हल्ल्यांपासून वाचवून येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. यातले अनेक हत्ती हे विकलांग आहेत. या सर्व हत्तीची येथे काळजी घेतली जाते. तसेच त्यांना पिंज-यात कैद न करता मुक्त सोडले जाते. येथल्या काही कर्मचा-यांनी डॅरिक आणि त्याने हत्तीसोबत घालवलेले काही क्षण कॅमे-यात कैद केले आहेत.