जगात प्रत्येक लोक स्वार्थी असतात असं नाही, काही लोक निस्वार्थी भावनेने देखील सेवा करत असतात, त्यांना पैसा महत्त्वाचा नसतो, तर त्यांना समाजसेवा महत्त्वाची असते. गेल्या कित्येक वर्षांपासून अशाच निस्वार्थी भावनेने समाजसेवा करत आहेत. दिल्लीचे ‘मटकामॅन’. त्यांचं खरं नाव आहे नटराजन. पण सारे दिल्लीकर त्यांना मटकामॅन याच नावाने ओळखतात.
वाचा : न्याहारीत भारतीयांची ‘या’ पदार्थाला जास्त पसंती
६८ वर्षांचे नटराजन गरिबांना मोफत पाणी पुरवतात. दिल्लीतल्या अनेक भागात त्यांनी माठ बसवले आहे. या माठात रोज सकाळी नटराजन पाणी भरतात. इथे राहणाऱ्या गरिबांना पिण्यायोग्य पाणी मिळावं यासाठी त्यांचा सारा खटाटोप सुरू असतो. त्यासाठी ते रोज सकाळी साडेचार वाजता उठतात. त्यांनी ठिकठिकाणी बसवलेल्या मटक्यात पाणी भरतात. या मठांवर त्यांनी आपला दूरध्वनी क्रमांक देखील लिहिला आहे. जर का माठातलं पाणी संपलं तर कोणीही निसंकोचपणे त्यांना फोन करु शकतं. नटराजन तातडीने पाण्याची सोय करण्यासाठी तिथे पोहोचतात. एवढंच नाही तर गरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी देखील ते मदत करतात. दिल्लीत अशी अनेक गरीब कुटुंब आहेत ज्यांच्याकडे एकवेळच्या जेवणासाठीही पैसे नसतात तेव्हा नटराजन शक्य असेल तेवढ्या सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात.
३२ वर्षे लंडनमध्ये त्यांनी इंजिनिअर म्हणून काम केलंय. काही वर्षांपूर्वीच त्यांना कॅन्सर झाला होता. कॅन्सरशी लढा देत त्यांनी नव्या आयुष्याला सुरूवात केली. यातून बाहेर आल्यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवा करण्यासाठी समर्पित करण्याचे त्यांनी ठरवलं.