हो माझ्या मुलाला मुलींचे सुंदर स्कर्ट घालायला आवडतात. माझा मुलगा पँट नाही तर स्कर्ट घालून रस्त्यावर फिरतो मग त्यात काय झाले ? लोकांच्या वेड्या वाकड्या प्रश्नांना आणि बोच-या नजरांना कंटाळलेल्या आईने फेसबुकवर आपला अनुभव शेअर केला आहे आणि आई मुलाच्या धाडसी निर्णयाची गोष्ट आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जग वाचत आहे.
ही गोष्ट आहे जेन अँडरसन या आईची आणि तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलाची. तिच्या मुलाला मुलींचे रंगीबेरंगी स्कर्ट घालायला आवडतात. मुलींच्या कपड्याबद्दलचे त्याचे आकर्षण इतके की फक्त घरातच नाही तर आईसोबत बाहेर कुठेही गेला तरी तो स्कर्टच घालून बाहेर जातो. या मुलाला त्याच्या आईने असे करण्यापासून कधीच रोखले नाही. स्कर्ट घालून या मुलाला वावरताना पाहून अनेकांनी  माय लेकाकडे बोच-या नजरेने पाहिले. मुलाला स्कर्ट घालणे बंद कर अशा धमक्या आईला दिल्या. तर काहिंनी हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे का असेही प्रश्न विचारले. फक्त स्कर्ट घालतो म्हणून निरागस मुलाकडे जगाची बघण्याची दृष्टीच बदलली. काहींनी तुझी आईच वाईट आहे येथपासून ही आई मुलाला मुलीचे कपडे घालून त्याचे शोषण करत असल्याचेही आरोप लावले. हे सगळे अनुभव या आईने फेसबुकवर सांगितले.
माझ्या मुलाला स्कर्ट घालावासा वाटतो, स्कर्ट घातला की त्याला आपण सुंदर आणि धाडसी असल्यासारखे वाटते मग माझ्या मुलाचे मन मोडण्याचा हक्क मला कोणी दिला असा सवाल तिने समाजाला केला आहे. कोणी काय घालावे आणि काय नाही हे सांगणारा समाज कोण आहे ? मुलींनी हे कपडे घालावे आणि मुलांनी ते असे कुठे लिहले आहे? त्यामुळे लोकांच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही अशी ठाम भूमिका या आईने घेतली आहे. आपल्या हा धाडसी निर्णय सांगताना तिचे कवितेच्या दोन ओळी देखील लिहल्या आहे.
आम्ही कोण आहोत हे आम्हाला ठावूक आहे, त्यामुळे कोणाचे प्रश्न किंवा वाकड्या नजरा माझ्या मुलाला त्याच्या आवडीचे कपडे घालण्यापासून रोखू शकत नाही असेही या आईने म्हटले सोबत आपल्या मुलाचा स्कर्ट घातलेला फोटो देखील आईने शेअर केला आहे.

Story img Loader