दमयंती आणि प्रदीप तन्ना यांनी सात वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात आपला एकूलता एक मुलगा गमावला. मुलगा गेल्याचं दु:ख कधीही न भरून निघण्यासारखंच होतं, पण या जोडप्यानं मात्र या धक्क्यातून सावरत ज्येष्ठ नागरिक आणि गरिबांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतलं.
त्यांचा मुलगा निमेशचा २०११ मध्ये चालत्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. निमेशची आठवण जपण्यासाठी दमयंती आणि प्रदीप यांनी मोफत जेवणाचा डब्बा पुरवण्याची सेवा सुरू केली. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या ११० ज्येष्ठ नागरिकांना ते मोफत जेवण पुरवतात. ज्या आईवडिलांना त्यांच्या मुलांनी सोडून दिलंय किंवा ज्यांची काळजी घेण्यासाठी कोणी नाही अशा ज्येष्ठ नागरिकांची काळजी ते घेतात. गेल्या पाच वर्षांपासून दमयंती आणि प्रदीप हा उपक्रम राबवत असल्याचे ‘एएनआय’ वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
Viral : म्हणून KFC ब्रँड ट्विटरवर फक्त ११ जणांना करतो फॉलो
Viral Video : दिलखेचक अदा आणि दमदार नृत्याने दोघींनी केलं नेटकऱ्यांना घायाळ
त्याचप्रमाणे दरमहिन्याला १०० गरिब कुटुंबाना तन्ना दाम्पत्य मोफत किराणा पुरवतात. आदिवासी पाड्यातील मुलांना वह्या, पुस्तकं, कपडे पुरवत शक्य तितकी मदत करतात. कधी कधी इतर नातेवाईक आणि मित्रपरिवार देखील तन्ना कुटुंबाला या चांगल्या कामात मदत करतात. ‘आमचा एकूलता एक मुलगा तर गेला, पण त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा आम्ही गरिब आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला’ असं ते अभिमानानं सांगतात. तन्ना कुटुंबियांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला असला तरी समाजसेवेतून त्यांनी आपल्या मुलाच्या आठवणी कायम जिवंत ठेवल्या आहेत.
A #Mumbai couple runs tiffin services since last 5 yrs for senior citizens in memory of their son who died in a train accident in 2011 pic.twitter.com/ouOvsAAqOq
— ANI (@ANI) October 25, 2017