पाणीपुरी हा भारतीयांचा सर्वात आवडता चाट पदार्थ. पाणीपुरी आवडत नाही असे फार क्वचितच आपल्याला मिळतील. अगदी पंधरा-वीस रुपयांना मिळणाऱ्या या पाणीपुरीचा व्यवसाय कोट्यवधींचा असू शकतो, याची कल्पना तरी तुम्ही केली का? अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधून पाणीपुरीची वाढती मागणी लक्षात घेऊन अहमदाबादस्थित एका फूड कंपनीने या व्यवसायात १०० कोटींची गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे.
वाचा : उत्तर कोरियातील नागरिकांची हेअरस्टाईल कशी असावी हे हुकूमशहाच ठरवतो
‘इनोव्हेटिव्ह फूड प्रॉडक्ट’ असं या कंपनीचं नाव असून, ती पाणीपुरी, पापड आणि पास्ताचे उत्पादन करते. ‘शेअरइट’ या नावाने कंपनीची उत्पादनं बाजारात प्रसिद्ध आहेत. या कंपनींच्या पाणीपुरीला फक्त भारतातच नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्वेतील देशांतूनही मोठी मागणी येऊ लागली आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेता या व्यवसायात २०२० पर्यंत १०० कोटींची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीचे सहसंस्थापक अंकित हंसालिया यांनी ‘डीएनएला’ यासंबधीची माहिती दिली.
वाचा : …आणि पोपटाने केली ऑनलाइन खरेदी
भविष्यात मध्यपूर्वेतील देश, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाणीपुरी किट आणि मल्टीग्रेन पाणीपुरीची विक्री करण्यासाठी आवश्यक ती तयारी कंपनीने सुरू केली आहे. सध्याच्या घडीला उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत आणि बांगलादेश, नेपाळमध्ये या कंपनीच्या उत्पादनांची विक्री होते.