रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण. देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. सर्वसाधारण त्या दिवशी दिसते तसेच चित्र त्या कॉलेजच्या मैदानातही दिसत होते. एकमेकांवर रंग उडवणारे, एकमेकांना चिखलात लोळवणारी तरुण मुले रंगपंचमी आपल्या पद्धतीने खेळत होती. आरडाओरड, हसणे, नाचगाणे अस सर्वकाही छान जमून आलेलं. अचानक सगळे थांबले. पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेली दोन मुले सर्वांना थांबायला सांगत होती. आम्हाला नमाज पठणासाठी मशिदीमध्ये जायचे आहे असं ते म्हणतं होते. त्यांनी विनंती केल्यावर अगदी पुढच्या क्षणाला रंगांमध्ये रंगलेली सर्व पोरं बाजूला झाली आणि त्या दोघांना रस्ता मोकळा करुन दिला. हा सगळाप्रकार तेथील एका फोटोग्राफरने आपल्या कॅमेरात टिपला आणि रंगलेल्या मुलांमधून बाहेर पडणारा पांढऱ्या कपड्यांमधील मुलाचा हा फोटो व्हायरल झाला.
काही दिवसांपूर्वी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीची आठवण करुन देणारा हा प्रकार खरोखरच घडला तो केरळमधील मल्लापुरम येथील महाविद्यालयाच्या मैदानामध्ये. सीपीए कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्समधील दुसऱ्या वर्षाला शिकत असणारी मुले रंगपंचमी खेळताना हा सर्व प्रकार घडला. मुलांनी दाखवलेला समजूतदारपणा बीबीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या मोहम्मद मासुख या विद्यार्थ्याने क्लिक केला आहे. मोहम्मद हा पार्ट-टाइम वेडिंग फोटोग्राफर आहे. त्याने टिपलेला हा क्षण आता चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोबद्दल ‘द न्यूज मिनीट’ या वेबसाईटशी बोलताना मोहम्मद म्हणतो, ‘मी सर्फ एक्सेलची जाहिरात पाहिली होती. पण तसा फोटो काढावा असं कधी माझ्या मनात आले नव्हते. मी माझ्या मित्राचा डीएसएलआर कॅमेरा घेऊन कॉलेजच्या मैदानातील रंगपंचमी सेलिब्रेशनचे फोटो काढत होतो. अचानक त्या गर्दीमधून दोन मुले आमच्या रंग उडवू नका आम्हाला नमाज पठणासाठी जायचे आहे असं सांगत बाहेर येताना दिसली. या मुलांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यांचे म्हणणे ऐकत कॉलेजच्या गेटपर्यंत जाण्याचा तो एकमेव मार्ग असल्याने रंगपंचमी खेळणारी सर्व मुले थांबली. त्यानंतर ती मुले रंग लावलेल्या मुलांच्या घोळक्यातून चालू लागली तेव्हा मी हा फोटो क्लिक केला. लगेच आम्ही सर्वांनी तो फोटो व्हॉट्सअप स्टेटस म्हणून ठेवला होता.’
नक्की वाचा >> ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीवरील राग काढला ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेल’वर
मोहम्मदने क्लिक केलेल्या या फोटोमधील पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमधील मुलगा आहे त्याच कॉलेजमध्ये बॉटनीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारा मोहम्मद सुहेल. या फोटोबद्दल बोलताना सुहेल म्हणतो, ‘प्रयोगशाळेत काम असल्याने मला त्या दिवशी कॉलेजमधून निघण्यास उशीर झाला. मी तिथून निघेपर्यंत इतर विद्यार्थ्यांनी मैदानात रंगपंचमी खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र मी मैदानातून जात असताना त्यांनी रंगपंचमी खेळायचे थांबवले आणि मला जाण्यासाठी रस्ता करुन दिला. दुसऱ्या दिवशी हा फोटो व्हायरल होत असल्याचे मला समजले. अनेकांनी मला या मुलांना तू पार्टी दिली पाहिजे असं सांगितले. खरं तर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जी चर्चा झाली त्यानंतर मी सर्फची ती जाहिरात पाहिली.’
नक्की वाचा >> Video: …म्हणून चर्चेत आहे #BoycottSurfExcel हॅशटॅग, पाहा व्हायरल जाहिरात
काही दिवसांपूर्वी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीवरून सोशल नेटवर्किंगवर चांगलाच वाद झाला. या जाहिरातीमध्ये एक हिंदू मुलगी मुस्लिम मुलाला रंगपंचमीच्या दिवशी नमाज पठणासाठी मशीदमध्ये कपडे न रंगवता जण्यास मदत करते, असे दाखवण्यात आले होते. धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत या जाहिरातीवर बंदी आणण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली होती. मात्र अनेकांनी मल्लापुरम येथील महाविद्यालयातील हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या जाहिरातीची आठवण काढली.