आपल्या विविध कार्यामुळे प्रसिद्ध असलेल्या हिऱ्याचे व्यापारी सावजी ढोलकिया यांचे नाव सर्वांनी अनेक वेळा ऐकले असेल. कधी कर्मचा-यांना बोनस म्हणून गाडी तर कधी विविध वस्तू भेट देण्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. पण आता आणखी एक हिरे व्यापारी महेशभाई सवाणी चर्चेत आले आहेत. सवाणी हे गरजू व अनाथ मुलींचे लग्न लावून देण्याचे पुण्यवान काम करतात. गेल्या ९ वर्षात त्यांनी जवळपास २८६६ मुलींचे कन्यादान केले आहे. तर आज रविवारी ते एकाच वेळी २३१ मुलींचा विवाह लावून देणार आहेत. त्यांच्या या कामाची सगळीकडे चर्चा केली जात आहे.
देशातील मुलींच्या प्रति आपले काही तरी कर्तव्य लागते या भावनेतून महेशभाई सवाणी हे कार्य सढळ हाताने करत असतात. धर्म व जातीच्या भिंती ओलांडून त्यांचे हे कार्य सुरू असते. २३ डिसेंबर २०१८ रोजी सवाणी २३१ मुलींचे कन्यादान करणार आहेत. यामध्ये ६ मुस्लिम व ३ ख्रिश्चन तरुणींचा समावेश आहे. पीपी सवाणी विद्या संकूलच्या समोरील रघुवीर वाडीमध्ये या सर्व तरुणींचा थाटामाटात विवाह लावून दिला जाणार आहे. हा आकडा गृहित धरला तर लग्न लावून दिलेल्या मुलींची संख्या ३०९७ च्या घरात जाईल.
आज होणाऱ्या लग्नसोहळयाला ‘लाडली’असे नाव देण्यात आले आहे. एक वर्षापूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या भूमी नामक मुलीच्या नावावर हा विवाह सोहळा समर्पित करण्यात आला आहे. महेशभाई सवाणी फक्त लग्न लावून थांबत नाहीत. लग्न लावून दिल्यानंतर संबंधित तरुणींच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी ते आपल्या खाद्यांवर उचलतात. त्यांच्या सर्व गरजा, मुला-मुलींचे शिक्षण, उपचार, कपडे यासाठी आर्थिक पाठबळ पुरविण्याचे काम ते न चूकता करत असतात.
या विवाहित मुलींना सरकारी योजनांचा लाभ मिळवा यासाठी देखील ते प्रयत्नशील असतात. सर्व तरुणींना आपल्या मुली समजून ते जावायाला रोजगार मिळवून देण्यामध्ये देखील मदत करतात. उल्लेखनीय म्हणजे मुलींना दत्तक घेण्यासाठी त्यांनी अर्ज सुद्दा केला आहे. याशिवाय संकटकालीन स्थितीत मुलींना मदत व्हावी यासाठी ते आपत्तकालीन निधीच्या एका योजनेवर काम सुद्घा करत आहेत.