कोणतही नातं टिकवणं हे त्या दोघांच्याही हातात असतं. स्वभाव जुळले नाही, अपेक्षाभंग झाला की नात्यात हळूहळू दुरावा येतो आणि नात्याचा नाजूक रेशीमधागा कधी तुटतो हेच आपल्याला कळत नाही म्हणूनच काही गोष्टींची काळजी आधीच घेणं गरजेचं असतं. आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट महिला कधीच बोलून दाखवत नाही. त्या पुरूषांनी समजून घ्याव्यात आणि त्याप्रमाणे वागणे त्यांना अपेक्षित असतं. तेव्हा माहिलांना अपेक्षित असलेल्या या गोष्टी जर पुरुषांनी केल्या तर नात्यातला हा गोडावा टिकून राहिल हे नक्की!
नात्यातील पारदर्शकता : अनेकदा पुरुषांना आपल्या बायकोने केलेली चौकशी खटकते. ‘मी काय करतो आहे हे तुला काय कारायचे आहे’ अशा प्रकारची उत्तरे नवऱ्याकडून बायकांना अनेकदा ऐकावी लागतात. पण महिलांना या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो. नात्यात पारदर्शकता असावी हा साधा आणि सोपा त्यांचा फंडा असतो. त्यामुळे नवऱ्याने प्रत्येक गोष्ट आपल्याला विश्वासात घेऊन करणे तिला अपेक्षित असते.
कौतुक : कौतुकाचे दोन शब्द देखील नात्यात नवी उमेद फुलवू शकतात. काहींना आपल्या बायकोचे जरा काही चुकले की ऐकून दाखवण्याची सवय असते. पण २४ तास घरासाठी राबणाऱ्या तिला फक्त कौतुकाच्या दोन शब्दांची अपेक्षा असते. त्यातूनच हे कौतुक तिच्या दिसण्यावर किंवा तिने बनवलेल्या जेवणासाठी केले तर सोन्याहून पिवळे.
संवेदनशीलता : हा नाजूक धागा टिकवायचा असेल तर संवेदनशीलताही तितकीच गरजेची असते. त्यामुळे पत्नी आपल्या पतीत संवेदनशील व्यक्ती शोधत असते.
समजूतदारपणा : चूक झाल्यावर चारचौघांत ओरडणारे पुरुष महिलांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे चूक झाल्यावर शांतपणे ती समाजवून सांगणे ही माफक अपेक्षा महिलांची आपल्या नवऱ्याकडून असते.
काळजी घेणे : जशी ती घरातल्या प्रत्येकाची काळजी घेते, घरातल्या प्रत्येकासाठी राब राब राबते तशी तिचीही काळजी घेणारे कोणतरी असावे असे तिलाही वाटते. काळजीचे दोन शब्दही तिच्यासाठी पुरेसे असतात. कधी कधी महागड्या भेटवस्तूपेक्षाही प्रेमाचे काळजीचे बोल तिला अधिक मौल्यवान वाटतात.
सरप्राईज : रोज रोजच्या रटाळ जीवनात कधीतरी एखादा आश्चर्याचा सुखद धक्का देखील तिला सूख आणि समाधान देऊन जातो. कधी गजरा, कधी फुलं तर कधी तिचे आवडते पदार्थ देऊन आपल्याला त्याने खूश करावे असे तिलाही वाटते. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि याच छोट्या छोट्या गोष्टींची तिला अपेक्षा असते. या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नात्यातला हा गोडवा कायम राहिल.