राहुल गांधी यांच्या सभेत आपल्याला खाट मिळाली नाही म्हणून उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूर काही शेतकरी त्रस्त आहेत. यातल्या एका शेतक-याचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झाला आहे. राहुल गांधींचे भाषण राहिले बाजूला पण आपल्याला सभेत खाट मिळणार या लालसेपोटी मी इथे आलो होतो पण इथे येऊन खाट तर मिळाली नाही पण हातात काँग्रेसचा झेंडा तेवढा आला अशी खंत या भाबड्या शेतक-यांने व्यक्त केली आहे.
राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौ-यावर आहेत येथे ते शेतकरी यात्रा करत आहे. उत्तर प्रदेशमधल्या शेतक-यांना भेटून त्यांची दु:ख जाणून ते घेणार आहेत. त्यामुळे त्याने खाट सभेचे आयोजन केले. आता गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशमधली खाट सभा चांगलीच चर्चेत आली होती. खर तर राहुल गांधी यांनी या सभेतून मोदी सरकारवर तोफ डागण्याचा प्रयत्न केला पण त्यापेक्षाही चर्चा रंगली ती सभेत उडालेल्या गोंधळामुळे. सभेत आपले भाषण ऐकण्यासाठी त्यांनी खाट मागवल्या होत्या पण सभा संपल्यावर लोकांनी खाटच लुटून नेल्या. या खाट घरी घेऊन जाण्यासाठी लोक खाटेवर तुटून पडले होते. रुद्रपूरमधला हा प्रकार सगळ्यांच्याच चांगला लक्षात राहिला. आता इतका गोंधळ माजूनही दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी मिर्झापूरमध्ये खाट सभा ठेवली. तिथेही तेच झाले. तेव्हा या खाट घरी घेऊन जाऊ नयेत असे आवाहन करण्यात आले पण लोक ऐकतील तर शप्पथ. येथेही खाट लुटण्यासाठी गोंधळ माजला. अनेकांना खाट पळवल्या देखील. पण या संपूर्ण प्रकरणात एक वृद्ध शेतकरी मात्र हतबल झाला. ‘येथे १० – १२ ट्रक भरून खाट आणल्या गेल्याचे मला समजले होते. सभेला गेल्यावर मला खाट मिळतील असे सांगण्यात आले. त्यामुळे खाटेच्या लालसेपोटी मी सभेला आलो आणि आता खाट तर मिळालीच नाही पण हातात काँग्रेसचा झेंडा तेवढा आला’ अशी कैफियत बिचा-या शेतक-याने प्रसारमाध्यमासमोर मांडली.