काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने सर्वांना रांगेत उभे केले. गेल्या ५० दिवसांपासून एटीएम आणि बँकाबाहेरील रांगाची चांगलीच चर्चा रंगली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दलच्या अनेक घटना समोर आल्या. सरकारच्या या निर्णयाचा देशातील प्रत्येक घटकाला झळ पोहचली. देशाच्या कानाकोपऱ्यात चलन कलह सुरु असताना नंदुरबार जिल्हातील एका गावाला मात्र देशात काय चाललय त्याची कल्पनाच नाही. या गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही वारे पोहचलेले दिसत नाही. तसेच मोदींनी घेतलेला निर्णयाचीही माहिती नाही. नंदुरबार जिल्ह्यातील रोशामल (बुद्रुक) या गावातील धक्कादायक माहिती ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने समोर आणली आहे. या गावातील लोक आजही भारतीय राजकारणामध्ये सोनिया गांधीचे सरकार असल्याच्या भ्रमात आहेत. सोनिया गांधीं या इंदिरांटच्या सून असताना हे लोक सोनिया यांना इंदिरा गांधी यांची मुलगी म्हणून ओळखतात. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार झाल्यानंतर २००० रुपयांची नवी नोट व्यवहारात आली. मात्र या गावातील लोकांनी आतापर्यंत बंद झालेली १००० रुपयांची नोटच पाहिली नसल्याचे समोर आले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाने देशातील अनेक लोकांना त्रस्त केले. मात्र या नोटांशी कधी संबंधच आला नसल्यामुळे गावातील लोकांवर या निर्णयाचा काहीच परिणाम झालेला नाही. या गावातील लोकांना जेव्हा सरकारने पैसे काढण्यावर घातलेल्या मर्यादेवर विचारले. त्यावेळी त्यांना या निर्णयाचा फारसा फरक पडत नसल्याचे दिसून आले. आमच्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महिनाभरासाठी १५०० रुपये पुरेसे आहेत. असे तेथील लोक सांगतात.
नोटाबंदीमुळे बाजारातील परिस्थिती कोलमडली आहे. परिणामी १३ ते १५ रुपये प्रति किलोच्या धान्याला त्यांना १० रुपये मिळत असल्यामुळे त्यांनी धान्य विक्रिसाठी बाजारात आणण्याचे बंद केले आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हे अदिवासी गाव प्राथमिक सुविधांपासून देखील वंचित आहे. रस्ते, पाणी, वीज या प्राथमिक गरजा देखील या ठिकाणी उपलब्ध नाहीत. या गावातील लोकांना आपले धान्य बाजारात नेण्यासाठी एखादी दोनचाकी वाहन किंवा जीप अवलंबून राहावे लागते. ही वाहने देखील कित्येक दिवसानंतर या ठिकाणी येतात. गावाच्या जवळपास पेट्रोल पंप देखील नाही. परिणामी या भागातील दुकानदार बाटलीमध्ये खुलेआम तेलाची विक्री करतानाचे चित्रही पाहायला मिळते.