IND vs PAK Anti Muslim Chants At World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानला ड्रेसिंग रूममध्ये जाताना “जय श्री राम” च्या घोषणांनी टोमणे मारण्यात आले. हा व्हिडिओ त्वरीत सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे DMK नेते उदयनिधी स्टॅलिन आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्यासह अनेकांनी निषेध व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता, सोशल मीडियावर एक वेगळा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये “जब मुल्ले काटे जायेंगे, राम-राम चिल्लाएंगे”, म्हणजेच “जेव्हा मुस्लिमांची कत्तल होईल, तेव्हा ते राम-राम पुकारतील” असा घोष केला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर अनेक लोकांनी व्हिडिओवरून चर्चा सुरु केली असता या व्हिडीओची आणखी एक बाजू समोर आली. इंडिया टुडेने या संदर्भात फॅक्ट चेक करत त्याआधारे दिलेल्या वृत्तानुसार, @Delhiite_ या ट्विटर अकाऊंटने व्हिडिओ शेअर करताना त्यात वापरलेला ऑडिओ हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील रॅलीचा असल्याचा संशय वजा आरोप काहींनी केला आहे.

इंडिया टुडेने जेव्हा यासंदर्भात कीवर्ड सर्चच्या मदतीने तपास केला तेव्हा दिसून आले की, मुस्लिमविरोधी घोषणा देण्यात आलेली ही क्लिप २६ जून रोजी ट्विटरवर शेअर केलेल्या २.२६ सेकंदांच्या व्हिडिओमधील आहे. यात हातात फलक आणि भगवे झेंडे घेतलेल्या लोकांचा मोर्चा दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये वापरलेला ऑडिओ या क्लिपच्या पहिल्या काही सेकंदांमधून काढण्यात आला आहे.

आम्हाला या निषेधाचे फुटेज न्यू इंडियन एक्स्प्रेसने २६ जून रोजी त्यांच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या अहवालात देखील आढळले. अहवालानुसार, हे निदर्शन हिमाचल प्रदेश राज्यभर आयोजित केलेल्या निषेधाच्या आंदोलनातील होते. दलित तरुणाची मुस्लिम व्यक्तीकडून हत्या झाल्याप्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला होता असे या वृत्तात सांगितले होते.

इंडिया टुडेने पुढील तपासात सांगितले की, YouTube वर कीवर्ड शोधत असताना, स्टेडियममधील व्हिडिओची मूळ आवृत्ती दिसून आली. १४ ऑक्टोबर रोजी “Beyond the Boundary” या YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या १.३२ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ए.आर. रहमान चे “माँ तुझे सलाम” गाणे स्टेडियममध्ये वाजत असल्याचे व उपस्थित प्रेक्षकही गात असल्याचे दिसून आले. व्हायरल क्लिप या व्हिडिओच्या दोन वेगवेगळ्या भागांमधून काढण्यात आली आहे.

व्हिडिओच्या हेडींगनुसार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर उपस्थितांनी रहमानचे वंदे मातरम गाणे गेले होते. १६ ऑक्टोबर रोजी “Beyond the Boundary” चॅनलने अपलोड केलेल्या सामन्याच्या ११ मिनिटांच्या व्हिडिओमध्येही हीच क्लिप दिसून येते.

त्यामुळे, हे स्पष्ट आहे की प्रश्नातील व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान मुस्लीमविरोधी घोषणा दिल्या जात असल्याचे प्रत्यक्षात दिसत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threatening anti muslim chants at ind vs pak in world cup 2023 match points dangerous threats given in video check reality svs