दुचाकींवरील कर्कश आवाजातील सायलेंसर आणि आपला थाट दाखवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट हे काही आता कोणाला नवीन राहिलेलं नाही. रस्त्यावरुन प्रवास करताना अशा अनेक दुचाकी नजरेला पडत असतात. पण उत्तर प्रदेशात तर दुचाकी चालकाने कहरच केला आणि विशेष म्हणजे यासाठी त्याला थेट जेलची हवा पण खावी लागली आहे.
झालं असं की, मुरादगंजचे अधिकारी अविनाश कुमार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना तीन तरुण दुचाकीवरुन जाताना दिसले. दुचाकीवरुन तिघे प्रवास करत असल्याने त्यांना थांबवण्यात आलं असता एक अजब प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांची नंबर प्लेट काही तरी भलतीच होती. तिथे रजिस्ट्रेशन नंबरच्या जागी “बोल देना पाल साहब आये थे” लिहिलं होतं.
फक्त एवढंच नाही, तर दुचाकीला कर्कश आवाजातील सायलेंसर लावण्यात आला होता. मूळचा सायलेंसर काढून त्या जागी थेट ट्रकचा सायलेंसर लावण्यात आला होता. याशिवाय तरुणांनी हेल्मेटदेखील घातलं नव्हतं. मग काय इतक्या नियमांचं उल्लंघन केलं असल्याने या तरुणांना थेट जेलमध्ये जावं लागलं. पोलिसांनी ट्वीट करत हा सगळा घटनाक्रम सांगितलं आहे.
औरेयाचे पोलीस अधिक्षक अभिषेक वर्मा यांनी ट्विटरला सर्व प्रकार सांगताना लिहिलेल्या गाण्याच्या ओळींनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या विजयपथ चित्रपटातील गाण्याच्या ओळी “राह में चलते मुलाक़ात हो गयी जिससे डरते थे वही बात हो गयी” त्यांनी ट्वीटमध्ये लिहिल्या आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांनीही या घटनेची दखल घेतल गाण्याच्या ओळींमधून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी तर थेट पाल यांनाच गाणं समर्पित केलं.
मैं ‘पाल’ दो ‘पाल’ का राइडर हूँ
‘पाल’ दो ‘पाल’ मेरी कहानी है
‘पाल’ दो ‘पाल’ मेरी हस्ती है
‘पाल दो पाल’ मेरी जवानी है
अटक करण्यात आलेल्या या तरुणांची नावं अंकित पाल, शिवम पाल आणि अमर पाल आहेत. या घटनेवर तुमचं मत काय?