भारत सरकारचा महत्वाकांशी उपक्रम ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत नामिबिया येथून काही चित्ते भारतात आणण्यात येणार आहे. त्यासाठी भारतातून नामिबिया येथे एक विमान पाठवण्यात आले आहे. या विमानाच्या समोरच्या भागावर वाघाचा भव्य चेहरा काढण्यात आला असून तो लक्षवेधी ठरत आहे.
नामिबियामधील विंडहोक येथील भारतीय उच्चायुक्तालयाने हा फोटो ट्विट केला आहे. वाघांच्या भूमित सदिच्छा घेऊन जाण्यासाठी शुरांच्या भूमित एक खास पक्षी उतरला, अशी पोस्ट देखील भारतीय उच्चायुक्तालयाने केली आहे.
(Baby Octopus : अंड्यातून कसे बाहेर पडत आहेत इवलेसे ऑक्टोपस, पाहा हा सुंदर व्हिडिओ)
पंतप्रधानांच्या हस्ते जंगलात सोडले जातील चित्ते
मध्यप्रदेशमधील शिवपूर जिल्ह्यातील कुणो राष्ट्रीय उद्यानात ‘रिइंट्रोडक्शन ऑफ चित्ता’ या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना राज्यातील जंगलात सोडणार आहे. विशेष म्हणजे, सत्तर वर्षांनंतर चित्त्यांना भारतीय जंगलात सोडण्यात येणार आहे. १९५२ साली भारतात चित्त्यांना विलुप्त म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर ७० वर्षांनी वेगवान चित्ते भारतीय जंगलात दिसून येतील.
नेटकऱ्यांनी दिल्या समिश्र प्रतिक्रिया
दरम्यान नेटकऱ्यांनी या बातमीवर समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काल या बातमीशी अप्रत्यक्षपणे संबंधित ७५ लाखांचा प्रश्न केबीसीमध्ये विचारण्यात आल्याची माहिती एका युजरने दिली. एका युजरने चित्त्यांचे स्वागत केले आहे. तर, एका युजरने चित्त्यांच्या स्थलांतराचा विरोध केला आहे. ते टिकणार नाही असे म्हटले आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन देणार ५०.२२ कोटी
चित्त्यांचे आफ्रिकेतून कुणो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतर करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पाच वर्षांसाठी ५०.२२ कोटी रुपयांचे योगदान देणार आहे. ही माहिती एका अधिकृत निवेदनाद्वारे सांगण्यात आली आहे.
(Magician trick : जादूगारची हातचालाखी पाहून तुम्हीही चक्रावून जाल, खुर्चीवरून कपडा हटवताच बघा काय झाले…)
‘प्रोजेक्ट चित्ता’ हा सरकारने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रजातीला देशात पुन्हा स्थापित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. भारताला वन्यजीव संरक्षणाचा मोठा इतिहास आहे. ‘प्रोजेक्ट चित्ता’ प्रमाणे ‘प्रोजेक्ट टायगर’ देखील १९७२ मध्ये सुरू करण्यात आला होता. हा उपक्रम यशस्वी ठरला. त्यानंतर आता ‘प्रोजेक्ट चित्ता’ उपक्रम राबवला जात आहे.