Tiger Elephant Shocking Video : सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ किंवा फोटो कधी व्हायरल होईल ते काही सांगता येत नाही. अनेकदा रील स्क्रोल करताना अशा काही गोष्टी समोर येतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे, जो पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. अनेकांना हा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न पडला आहे की, हे कसं काय शक्य आहे. कारण- या व्हिडीओत चक्क एका वाघाला हत्तीवर बसून नेले जात आहे, जे पाहून लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
व्हायरल झालेली ही घटना बिहारमधील असल्याचा दावा केला जात आहे; पण ही घटना बिहार नाही, तर उत्तराखंडमधील आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका भल्यामोठ्या हत्तीवर वाघाला बांधून कुठे तरी नेले जात आहे. यावेळी वाघाच्या पाठीवर एक व्यक्ती बसली आहे, जी वाघाचे दोन्ही कान पकडून ओढतेय. एखाद्या पाळीव श्वानाबरोबर आपण जसे खेळतो, त्याला कुरवाळतो अगदी त्याच प्रकारे वाघावर बसलेली व्यक्ती त्याला ट्रीट करतेय. यावेळी वाघ पाहण्यासाठी लोकांची आजूबाजूला मोठी गर्दी जमा झाली आहे. लोक व्हिडीओ काढत वाघाच्या पायाला हात लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे शिकारी वाघाला हत्तीवरून नेतान पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. पण, या वाघाला अशा प्रकारे का नेले जात होते याविषयीची माहितीही समोर आली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्स आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पण, व्हिडीओमागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोर आले की, ही घटना जानेवारी २०११ मध्ये नैनिताल, उत्तराखंडमध्ये घडलेली आहे. व्हिडीओतील वाघीण ही नरभक्षक होती, जिला वनाधिकाऱ्यांनी पकडले.
“हा एक जुना व्हिडीओ आहे, जो उत्तराखंडमधील रामनगरमध्ये शूट करण्यात आला होता. या वाघिणीने सहा जणांना यमसदनी पाठवले होते आणि त्यामुळे तिला वनाधिकाऱ्यांनी पकडले. पण या ठिकाणी वाहने पोहोचू न शकल्यामुळे कदाचित वाघिणीला हत्तीवरून नेले जात होते, असा अंदाज भारतीय वन सेवेचे अधिकारी परवीन कासवान यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.