विशाखा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

एका व्यक्तीचे विविध सोशल मीडिया साईटसवर एकाहून अधिक अकाउंट असणे यात काहीच नावीन्य नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या अ‍ॅप्सचा वापर इतक्या मोठय़ा प्रमाणावर आहे की त्याच्या तुल्यबळ असे दुसरे सोशल मीडिया अ‍ॅप आहे की नाही हा प्रश्न पडावा. पण सध्या टीनएजर्स फेसबुक इन्स्टाग्रामपेक्षाही पसंती देतायेत ती टिकटॉक या अ‍ॅपला. इतर लोकप्रिय समाजमाध्यमांमध्ये आणि यामध्ये मोठा फरक म्हणजे इकडे आपण फोटो किंवा शाब्दिक पोस्ट शेअर करत नाही, तर केवळ व्हिडीओच्या माध्यमातून या अ‍ॅपवर वापरकत्रे वेगवेगळ्या पोस्ट टाकू शकतात.

हल्ली व्हाटसअ‍ॅपवर येणाऱ्या अनेक व्हिडीओपकी कित्येक व्हिडीओ टिकटॉकवरच तयार केलेले असतात. १५ सेकंदांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते एडिट करून याच अ‍ॅपवर पोस्ट करता येतात. या १५ सेकंदांच्या व्हिडीओची गंमत अशी की आपल्याला हव्या त्या ऑडीयो क्लिपचा वापर करता येतो, त्याला इफेक्टदेखील देता येतो. रिव्हर्स, स्लो मोशन अशा साध्यासाध्या इफेक्टचा वापर करून हा व्हिडीओ सजवला जातो.

हाती लागलेलं अमर्याद इंटरनेट आणि तितकाच रिकामा वेळ यामुळे काही कलंदर लोक यावरच आपली कला दाखवायला लागले. मग ती व्हिडीओ एडिटिंगमध्ये असो की एखाद्या गाण्यावर आपल्या उतू जाणाऱ्या अभिनयकौशल्याची असो. आपला अभिनय बसल्याजागी दाखवून तो इतर सोशल मीडियासह टिकटॉकवरही लगेच पोस्ट करून मिळणाऱ्या हजारो लाईक्सलाच प्रसिद्धी समजून खूश व्हायचं. प्रसिद्धी मिळवण्याच्या या सोप्या मार्गामुळे हल्ली जागोजागी टिकटॉक स्टार्स तयार झालेत. प्रचंड वेगाने लोकप्रिय होणारे हे अ‍ॅप असले तरी त्याला नाकं मुरडणारेदेखील अनेकजण आहे. टिकटॉक अ‍ॅपबाबतीत दोन गट तयार झाले आहेत. एक टिकटॉक वापरणारा आणि एक टिकटॉक वापरणाऱ्यांना नावे ठेवणारा! खरं तर टिकटॉकला नावे ठेवणाऱ्यांची आणि त्यावर वेळ वाया घालवणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे असं मत असलेल्यांची संख्या जरी जास्त असली, तरी टिकटॉक वापरणाऱ्यांची संख्या त्याला पुरून उरणारी आहे. टिकटॉकवर असलेले व्हिडीओज बघणं फालतूपणा आहे असं मानणाऱ्या गटाने सगळ्याच सोशल मीडिया साईट्सवर टिकटॉकप्रेमींना ट्रोल केले, त्यांच्यावर मिम्स तयार केले. पण दुसरीकडे टिकटॉक वापरणाऱ्यांची संख्या मात्र दिवसागणिक वाढतेच आहे, इतकी की त्या अ‍ॅपने इतर सर्व सोशल मीडिया अ‍ॅपचे विक्रम मोडीत काढले आहे. २०१८ मध्ये सर्वात जास्त वेळा डाउनलोड झालेल्या अ‍ॅपचा किताब पटकावला आहे. एवढेच नाही तर या अ‍ॅपचे फक्त भारतातच सुमारे दोन कोटी वापरकत्रे आहेत!

टिकटॉक या अ‍ॅपला चीनमध्ये डोयीन या नावाने ओळखले जाते. हे अ‍ॅप चीनमध्येच पहिल्यांदा लाँच करण्यात आले होते. त्यानंतर हे अ‍ॅप तयार करणाऱ्या बाईट डान्स या कंपनीने ‘म्युझिकली’ हे अ‍ॅप खरेदी केले आणि टिकटॉक या नावाने हे अ‍ॅप जगभरातल्या टीनएजर्सना डोळ्यापुढे ठेवून विकसित केले. बघता बघता या अ‍ॅपने प्रसिद्धी मिळवली, इतकी की महिन्याला ५० कोटी लोक या अ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह असतात.

सध्या सोशल मीडियावर दिवसभर असणाऱ्या तरुणाईला इन्स्टंट मनोरंजन हवे असते. अगदी फेसबुकवर मोठय़ा पोस्ट वाचण्याचा कंटाळा येतो म्हणून लोकप्रिय झालेलं इन्स्टाग्राम असो, की व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज लिहायचा कंटाळा येतो म्हणून झटपट फोटो पाठवणारे स्नॅपचॅट असो. झटपट मनोरंजनाचा फॉम्र्युला लगचेच लोकप्रिय होतो. फक्त १५ सेकंदांचे व्हिडीओ तयार करता येणारे अ‍ॅप त्यामुळेच लोकप्रिय झाले आहे. व्हिडीओची कालमर्यादा अगदीच अल्प असल्याने त्यात क्रिएटिव्हिटीला जोर येतो. वेगवेगळ्या सिनेमांची गाणी, डॉयलॉग्ज, विनोदी प्रसंग यासोबतच या अ‍ॅपवरून विविध चॅलेंजेससुद्धा व्हायरल झाली होती.

कमीत कमी वेळात होणारे मनोरंजन (की टाईमपास?) यामुळे हे व्हिडीओज लोकप्रिय झालेच, पण हे व्हिडीओ तयार करणाऱ्या तरुणाईला व्हिडीओ तयार करणे हे क्रिएटिव्हिटीसोबतच संवंग लोकप्रियतेचे माध्यम आयतेच मिळाले. हातात असलेल्या मोबाइलव्यतिरिक्त इतर काहीही या व्हिडीओसाठी लागत नाही. आपल्याला इतर काहीही येत नसले तरी एखाद्या चित्रपटाच्या संवादासोबत नुसते ओठ हलवता आले म्हणजे पुरे! तेसुद्धा नीट जमत नसेल तर यात ऑडिओचा वेग कमी करण्याची सोय आहे. म्हणजेच कमी वेगाने सुरू असलेल्या ऑडिओसोबत आपण अभिनय करायचा आणि या व्हिडीओला मग वेगवेगळे इफेक्ट द्यायचे. हा व्हिडीओ डाऊनलोड करून इतर सोशल मीडियावर पोस्ट करायचे. एरवी आरशासमोर उभे राहून जी हिरोगिरी करायचो, तीच रेकॉर्ड करायची असा हा मामला!

इतर सोशल मीडियाप्रमाणे टिकटॉकवरही प्रमोशन्सच्या माध्यमातून पसे कमावण्याची सोय आहेच. आपल्या व्हिडीओमधून स्थानिक आणि मोठमोठय़ा बॅ्रण्डच्या उत्पादनांचे प्रमोशन केले जातेच, पण मोठमोठय़ा जागतिक ब्रॅण्डचेसुद्धा प्रमोशन वेगवेगळ्या ‘चॅलेंज’च्या माध्यमातून केले जाते. या अ‍ॅपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे जागतिक स्तरावर सर्वच सोशल मीडिया अ‍ॅप्सना याची दाखल घेणे भाग पडणार आहे. चीनमध्ये वापर होत असलेले अ‍ॅप्स हे आत्तापर्यंत चीनपुरतेच मर्यादित होते. जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरले जाते तर चीनमध्ये वीचॅट, जगभरात गुगल हे सर्च ंजिन वापरले जाते तर चीनमध्ये बैदू (ुं्र४ि). आणि आत्ता चीनमधले टिकटॉक हे वाढत्या लोकप्रियतेबरोबर जगभरात पसरताना दिसते.

एकीकडे टिकटॉकची प्रचंड लोकप्रियता, तर दुसरीकडे टिकटॉकचा अतिवापर हा चिंतेचा विषय आहे. मागे आलेले किकी चॅलेंज हे टिकटॉकच्या मदतीने केले जाणारे जीवघेणे चॅलेंज ठरले होते. यासोबतच अनेक ठिकाणी टिकटॉकच्या वेडापायी तरुणांना गंभीर जखमी झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. टिकटॉकच्या अतिवापरामुळे त्याचे अ‍ॅडिक्शनसुद्धा होते. मग आपले व्हिडीओ हवे तितके लोकप्रिय झाले नाहीत तर येणारे नराश्य इतर मानसिक आजारांना आपसूकच आमंत्रण मिळते, एवढेच काय, घरच्यांनी टिकटॉक वापरायला परवानगी दिली नाही म्हणून आत्महत्या केल्याच्याही घटना आहेत. टीन एजर्सना या टिकटॉकच्या व्यसनाचा विळखा पडला आहे, ही गोष्ट गंभीर आहे खरी. पण केवळ एका अ‍ॅपच्या र्निबधामुळे हे व्यसन कमी होणारे नाही. एखाद्या अ‍ॅपची लोकप्रियता प्रचंड असू शकते. पण त्या अ‍ॅपच्या वापरामध्ये सुरक्षेची खात्री असणेदेखील गरजेचे असते. टिकटॉकवर सध्या कुठलेही निर्बंध नाहीत. त्यातील आक्षेपार्ह व्हिडीओवर तक्रार करता येते, पण तो व्हिडीओ हटवण्याची कोणतीही कारवाई होत नाही. त्यातील व्हिडीओचा गैरवापर होणार नाहीच याची खात्री नाही. त्यामुळे झटपट मनोरंजनाचा हा फॉम्र्युला दोन घटका करमणुकीसाठी लोकप्रिय होत असला तरी त्याचा वापर डोळसपणे करणे महत्त्वाचे ठरेल.
सौजन्य – लोकप्रभा

Story img Loader