व्हॉट्सअॅप हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपमुळे आपल्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. व्हॉट्सअॅपमुळे आपण दिवसाचे २४ तास एकमेकांच्या संपर्कात राहतो, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण कधीकधी काही माणसं स्वत:च एखाद्या व्यक्तीशी संपर्क तोडून टाकतात. म्हणजे बघा ना भांडणं झालं किंवा एखाद्या क्रमांकावरून त्रासदायक मेसेज येऊ लागले की युजर्स त्याला ब्लॉक करतात. यासाठी व्हॉट्सअॅपने ‘कॉन्टॅक्ट ब्लॉक’चा पर्यायही आपल्याला दिला आहे. आपण ज्यांना ब्लॉक केलं आहे त्यांची यादी व्हॉट्सअॅपमधील सेटिंगच्या माध्यमातून पाहाता येते. पण समोरच्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केलं असल्यास ते मात्र आपल्याला दिसत नाही.
मात्र हे ओळखणं म्हणावं तेवढं कठीण नाही काही. सोप्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे की नाही हे सहज ओळखता येईल. यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टींची मदत होऊ शकते.
वाचा : देवीसाठी साडेसहा कोटींची डिझायनर साडी; तिही सोन्याची
१. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला व्हॉट्स अॅपवर ब्लॉक केले असेल तर तुम्हाला त्याचा ‘फोटो’, ‘स्टेटस’ किंवा ‘लास्ट सीन’ दिसणार नाही. पण, काहीवेळा युजर्स आपल्या ‘प्रायव्हसी सेटिंग’मध्ये बदल करतो त्यामुळेही बरेचदा युजरचा फोटो, स्टेटस किंवा लास्ट सीन दिसत नाही, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणंही तितकीच गरजेचं आहे.
२. एखाद्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले की त्या व्यक्तीला मेसेज जात नाही. व्हॉट्स अॅपवर मेसेज केल्यानंतर दोन टिक येतात. समजा त्या व्यक्तीने ब्लॉक केले तर दोन टिक दिसण्याऐवजी तुम्हाला एकच टिक दिसेल. कदाचित त्या व्यक्तीचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे किंवा नेटवर्कमुळेही त्याला मेसेज गेला नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण फोटो, स्टेटस, लास्ट सीन न दिसणे आणि मेसेज केल्यानंतर फक्त एक टिक दिसली तर मात्र संबधित व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता अधिक असते.
३. जर त्या व्यक्तीला तुमच्या नंबरवरून व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल जात नसतील तर त्या व्यक्तीने तुमचा नंबर ब्लॉक केला आहे असं समजावं.