Viral Video: मैत्री हे सगळ्यांच्या आयुष्यातील खास नातं असतं. एखादी आनंदाची बातमी असो किंवा दुःखाची; ती पहिल्यांदा समजल्यावर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीलाच सांगता. कारण- तुम्हाला माहीत असते की, कितीही वाईट प्रसंग आला तरीही तो एक मित्र किंवा मैत्रीण तुमची साथ कधीच सोडणार नाही. पण, या घट्ट मैत्रीची सुरुवात अगदी नकळत झालेली असते. तुमच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली, असा प्रश्न आपल्यातील अनेकांना विचारला, तर प्रत्येकाकडे एक रंजक, मजेशीर किंवा भावूक गोष्ट नक्कीच तयार असेल. तर, आज सोशल मीडियावरही मैत्रीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन मित्र-मैत्रिणींची मैत्री चक्क एका टिश्यू पेपरमुळे सुरू झाल्याचे दिसून येतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिगोच्या विमानामध्ये दोन अनोळखी व्यक्तींमध्ये अनपेक्षितपणे मैत्रीची सुरुवात होते. तर, याबाबतची गोष्ट अशी आहे की, सिद्धी आणि शुभम हे दोघे तरुण-तरुणी इंडिगो विमानातून प्रवास करीत असतात. शुभमला पाहून सिद्धीला त्याच्याशी मैत्री करण्याची इच्छा होते. थोडं धाडस दाखवून, ती तरुणी ‘तू खूप क्युट आहेस’, असा मजकूर आणि स्वतःचा फोन नंबर टिश्यू पेपरवर लिहिते आणि शुभमकडे देते. हे पाहून शुभमदेखील खुश होतो आणि दोघांच्या मैत्रीला नकळत सुरुवात होते. एकदा व्हायरल व्हिडीओतून पाहा त्यांच्या मैत्रीचा हा प्रवास…

हेही वाचा…ओला ड्रायव्हरची नवी शक्कल, बनावट स्क्रीनशॉट दाखवत तरुणीला फसवण्याचा केला प्रयत्न; वाचा नेमकं घडलं काय?

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ‘तू खूप क्युट आहेस’, असा मजकूर लिहिलेला टिश्यू पेपर जेव्हा तरुणी शुभमकडे देते. तेव्हा शुभम ‘अगदी तुझ्यासारखा’ असा रिप्लाय टिश्यू पेपरवर लिहितो. मजकूर लिहिलेल्या टिश्यू पेपरची एकमेकांना देवाणघेवाण करीत या दोघांच्या मैत्रीला सुरुवात होते आणि विमान प्रवासात योगायोगाने भेटलेले सिद्धी आणि शुभम आज खूप चांगले मित्र आहेत. तसेच त्यांच्या मैत्रीला जवळजळ दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे निमित्त साधून तरुणीने हा रील व्हिडीओ एडिट करून, त्यांची अनोखी गोष्ट व्हिडीओतून दाखवली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @siddhicee आणि @shubham.pille या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून इंडिगो एअरलाइन्सनेदेखील त्यांना प्रतिसाद दिला आहे. “कोणाला माहीत होते की, ३० हजार फुटांवर मिळालेल्या एका संधीतून मैत्रीची सुरुवात होऊ शकते. जीवनाचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय बनविणारा अनपेक्षित प्रसंग आज येथे पाहायला मिळाला”, अशी कमेंट या व्हिडीओखाली करण्यात आली आहे. एकूणच सोशल मीडियावर ही गोष्ट अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tissue paper note leads siddhi chokhani and shubham pille to ten year friendship indigo reacts to in flight story asp