‘कधीही न बुडणारे जहाज’ अशी ज्या जहाजाची ख्याती होती त्या टायटॅनिक जहाजाला आपल्या पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली. १५ एप्रिल १९१२ रोजी हे महाकाय जहाज हिमनगावर आदळून उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले. २०१२ मध्ये या घटनेला १०० वर्षे झाली. पण आता हे जहाज हिमनगावर आदळून बुडाले नसल्याचा दावा आररिश पत्रकार सेनेन मोलॉनी यांनी केला आहे. या पत्रकाराने केलेल्या संशोधनानुसार टायटॅनिक हे आगीमुळे बुडाले. बॉयलरच्या भागात आग लागली होती. यामुळे जहाज कमकुवत झाले होते. या भागाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यातूनच कमकूवत झालेला भागच हिमनगाला आदळला म्हणून हे जहाज बुडाले असा दावा त्यांनी केला आहे.

वाचा : पुन्हा एकदा पाहायला मिळणार ‘टायटॅनिक’

ब्रिटनच्या साऊथ हॅप्टन येथून न्यूयॉर्कला जाण्यासाठी टायटॅनिक जहाज निघाले होते. पण ते कधीच न्यूयॉर्कला पोहचले नाही. १४ एप्रिलला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागराच्या विशाल हिमनगावर हे जहाज आदळले. १५ एप्रिलला अवघ्या २ तास ४० मिनिटांत हजारो प्रवाशांना पोटात घेऊन या जहाजाने जलसमाधी घेतली. हा घटनेला आता १०५ वर्षे होतील. या जहाजाला जलसमाधी मिळाल्यानंतर १०० वर्षांनंतर दुर्घटनेबद्दल नवा दावा पत्रकार सेनेन मोलॉनी यांनी केला आहे. बॉयलर भागात सतत आग भडकत होती. या आगीमुळे टायटॅनिकचे भाग अत्यंत कमकूवत झाले होते. त्यातून कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी गत झाली. हे जहाज विशाल हिमनगावर आदळले आणि टायटॅनिक तुटले. पण आगीमुळे ते आधीच कमकुवत झाले होते असा दावा त्यांनी केला आहे. यावर त्यांनी एक माहितीपट बनवला असून तो लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मोलॉनी यांनी तीस वर्षे यावर अधिक संशोधन केले. आगीमुळे जहाजाच्या पट्ट्या खूपच कमकूवत झाल्या होत्या. त्यावेळी जहाजातील बॉयलरचे तापमान हे १ हजार डिग्रीच्या वर पोहचले होते. त्यामुळे हिमनगावर आदळताच हे तुटले असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यामुळ टायटॅनिक बुडण्याचे खरे कारण हे हिमनग नसून मानवी निष्काळजीपणा आणि आग होते असे समोर आले आहे.

Story img Loader