संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच, नवरा बायकोत कधीना कधी खटके उडणारच. मात्र या सगळ्यांचा त्रास आजीवन सहन करावा लागू नये म्हणून अमेरिकेतल्या एका पतीनं चक्क ६२ वर्षांपासून मुकबधीर असल्याचं ढोंग केलं. हे ढोंग त्यानं इतक्या उत्तमरित्या वठवलं की तो मुकबधीर नसल्याची कोणालाही शंका आली नाही. बायकोची बोलणी ऐकावी लागू नये म्हणून मुकबधीर म्हणून वावरणाऱ्या या पतीचं बिंग अखेर फुटलं. आता त्यांच्या पत्नीनं घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
अमेरिकेतील एका शहरात राहणाऱ्या ८० वर्षीय डोरथी यांनी ८४ वर्षीय पती बेरीसोबत घटस्फोट घेण्याचं पक्क केलं आहे. गेल्या ६२ वर्षांपासून मुकबधीर असल्याचं ढोंग वठवून बेरीनं आपला विश्वासघात केला आहे असा आरोप डोरथीचा आहे. ‘बेरी मुकबधीर आहे असं मला वाटलं. आम्हाला संवाद साधण्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी त्यांच्यासाठी सांकेतिक भाषा शिकले. यासाठी मी जवळपास २ वर्षे मेहनत घेतली. आमच्या मुलांना आणि नातवंडांनाही ते मुकबधीर असल्याचं वाटलं. ६२ वर्षांत ते खोटं बोलत असल्याची साधी शंकाही आम्हाला नाही’ असं डोरथी म्हणाल्या.
एका बारमध्ये कॅराओके नाइट्स दरम्यान बेरी यांचं ६२ वर्षांपासून लपवून ठेवलेलं बिंग फुटलं. एका मिटींगसाठी जातो असं सांगून बेरी घराबाहेर पडले, मात्र मिटींगला न जाता ते बारमध्ये गाणी गात होते. ‘त्यांना बोलता येतं हे त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदा कळलं त्यांनी आम्हा सर्वांचा विश्वासघात केला असल्याचं डोरथी म्हणाल्या. तिनं आता घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
मात्र दुसरीकडे बेरी यांच्या ढोंगाचं त्यांच्या वकिलांनी समर्थन केलं आहे. ‘डोरथी या खूपच बडबड्या आहेत. जर बेरी यांनी मुकबधीर असल्याचं डोंग वठवलं नसतं तर दोघांचा संसार ६० वर्षांपूर्वीच मोडला असता’ असं म्हणत बेरी यांचं वकिलांनी समर्थन केलं आहे.
पण डोरथी यांनी बेरीपासून विभक्त होण्याचा निर्णय पक्का केला आहे. तसेच गेल्या ६२ वर्षांपासून झालेल्या मानसिक त्रासबदद्ल त्यांनी नुकसान भरपाईची माणगीही केली आहे.