साड्यांच्या दुकांनात सूट जाहिर झाली अन् तिथे महिलामंडाळाने खरेदीसाठी गर्दी केली नाही तर नवलच म्हणावे लागले. कर्नाटकमधल्या बीदरमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. नोटाबंदीचा प्रचार करण्यासाठी या भागातील एक दुकानदार चक्क १ रुपयात साडीची विक्री करत होता. ही बातमी जेव्हा गावात पसरली तेव्हा गावातील महिलांनी साडी खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांग लावली. महिलांची गर्दी इतकी होती की चक्क पोलिसांना इथे तैनात करावे लागले. पण ही साडी खरेदी करताना ग्राहकापुढे एक अट ठेवण्यात आली होती.
वाचा : ..म्हणून शर्टच्या मागे असते ही छोटी पट्टी
कर्नाटकमधील बीदर येथील सुष्टी दुष्टी साडीचे मालक चंद्रशेखर पसार्गे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आपल्या दुकानातील सर्व साड्यांची विक्री १ रुपयाला करण्याचे ठरवले आहे. पण, यासाठी त्याने एक अट ठेवली आहे. ‘द हिंदू’ने दिलेल्या माहितीनुसार या दुकानदाराने ग्राहकांपुढे एक अट ठेवली. ही अट म्हणजे ग्राहकांनी एक रुपयाची नोट देऊन साडीची खरेदी करायची आहे. या साड्यांची किंमत १०० रुपये असल्याचे समजत आहे. यामुळे आपले नुकसान होत असले तरी मला याची पर्वा नाही. नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी तसेच नवीन वर्षाची भेट म्हणून मी ही सवलत देत असल्याचे पासर्गे यांनी सांगितले.
VIRAL VIDEO : पैशांसाठी नाही तर खरेदीसाठी लावली भलीमोठी रांग
जोपर्यंत आपण १ लाख साड्यांची विक्री करत नाही तोपर्यंत ही सूट अशीच सुरू राहणार असल्याचेही पासर्गे यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत तीन हजार साड्यांची विक्री केली आहे. दरम्यान गावात ही बातमी समजताच सगळ्यांनी या साडीच्या दुकानाबाहेर गर्दी केली. महिलांची इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहून पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोलवावे लागले. यातल्या एका महिलेने तर आपण साडी खरेदीसाठी खास सुट्टी घेऊन रांगेत उभे राहिल्याचेही सांगितले.