सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन्स आणि सोशल मीडिया हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. आपण काय खातोय, कुठे जात आहोत, कुणासोबत फिरत आहोत याची सर्व माहिती सोशल मीडियावर शेअर करणे एखादा अलिखित नियम असावा तसे त्याचे प्रत्येक जण पालन करीत असतो. जे आपल्याबद्दल शेअर करीत नाहीत, ते इतरांच्या स्टोरीज, फोटो, व्हिडीओ बघून दिवस-रात्र त्या सहा इंची स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसलेले असतात.
मात्र, या सवयींनी आपण आपल्या घरच्यांना, घरात असूनही वेळ देऊ शकत नाही. सध्याची तरुण पिढी ही कुटुंबीयांसोबत क्वचितच गप्पा मारायला किंवा जेवायला एकत्र बसते, अशी परिस्थिती प्रत्येक घरात निर्माण झाली आहे. मात्र, अशा या स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचे व्यसन सोडवण्यासाठी मंजू गुप्ता नावाच्या एका महिलेने अत्यंत भन्नाट शक्कल लढवल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टवरून समजते.
हेही वाचा : पुणे सायबर फ्रॉड! सोशल मीडियावर पोस्ट लाइक करताच बसला २० लाखांचा फटका; जाणून घ्या काय आहे प्रकरण….
मंजू गुप्ता या महिलेने आपल्या कुटुंबीयांचे स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी चक्क ५० रुपयांचा एक नॉन ज्युडिकल [बिगरन्यायिक] स्टॅम्पपेपर तयार केल्याचे या फोटोमधून दिसते. त्यावर हिंदी भाषेत मजकूर लिहिलेला आहे. त्यानुसार मंजू गुप्ता यांनी त्यांच्या मुलांच्या फोनच्या सवयींबद्दल काही विशिष्ट नियमावली तयार केली आहे. “माझ्या कुटुंबीयांना माझ्यापेक्षा त्यांचा फोन जास्त प्रिय झाला आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे नियम बनवत आहे. १- घरातील सर्व सदस्य सकाळी उठल्या उठल्या फोन हातात न घेता सूर्यदेवाला नमस्कार करतील. २- सगळ्यांना जेवणाच्या टेबलवर एकत्र बसूनच जेवावं लागेल. जेवताना प्रत्येकाचे फोन टेबलापासून २० पावले लांब ठेवले जातील. ३- बाथरूममध्ये जाताना फोन घेऊन जाऊ नये. आतमध्ये बसून रील्स बघण्याऐवजी तुम्ही ज्या कामासाठी गेला आहात, त्याकडे लक्ष द्या.
हे मी रागावून किंवा चिडून लिहिलेलं नाहीय. पण, मला माझ्या मुलांनी दाखवलेल्या सिनेमामधील पात्रांप्रमाणेच, त्यांनादेखील सोशल मिडियावर मिळणाऱ्या ‘लाइक्स’चे वेड लागले आहे, असे मला वाटते.
वरील नियमांपैकी कोणताही नियम मोडल्यास, शिक्षा म्हणून कुणालाही एक महिन्यासाठी झोमॅटो किंवा स्विगीवरून काही ऑर्डर करता येणार नाही.”
एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियाद्वारे @clownlamba नावाच्या एका हॅण्डलरने “माझ्या मावशीनं घरातील प्रत्येकाकडून या करारावर सह्या करून घेतल्या आहेत” असे लिहून त्या कराराचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर होताच अर्थात नेटकऱ्यांचे या भन्नाट पोस्टने लक्ष वेधून घेतले. त्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहा.
हेही वाचा : भारतीयांचे पाच भन्नाट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; पत्त्यांच्या बंगल्यापासून ते मेट्रो प्रवास, विक्रमांची यादी पाहा….
“ही मावशी नक्कीच एक नवा आदर्श ठेवत आहे,” असे एकाने लिहिले आहे. “बरोबर आहे,” असे दुसऱ्याने लिहिले आहे. “नवीन समस्यांवर, नवीन समाधान,” असे तिसऱ्याने लिहिले आहे. “हे फक्त भारतातच होऊ शकते,” असे चौथा म्हणतो आहे. शेवटी पाचव्याने “मला हे नियम तोडल्यानंतर काय शिक्षा मिळणार हेच पाहायचं होतं. आणि ती शिक्षा वाचून मला भारी मजा आली. या पोस्टमुळे मी खूप हसलो,” असे सांगितले.
या पोस्टला आतापर्यंत ४९२.९ K इतके व्ह्युज आणि पाच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.