पूराच्या प्रवाहात अडकलेल्या पिल्लाला वाचविण्यासाठी हत्तींच्या कळपाने स्वत:चा जीव धोक्यात घातल्याची घटना ओडिशामध्ये घडली आहे. या पिल्लाला वाचविण्यासाठी नदीत उतरलेला हत्तींचा कळप रविवारी रात्रीपासून क्योंझर येथील बेटावर अडकून पडला आहे. सध्या वनाधिकारी आणि स्थानिकांकडून हत्तींच्या या कळपाला बेटावरून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वैतरणी नदीला पूर आल्यामुळे क्योंझर येथील एरंडेई गावानजीक हत्तींचा हा कळप नदीतील बेटावर अडकून पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
क्योंझरच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या मयुरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल व्याघ्र अभयअरण्यातून  हत्तींचा हा कळप अन्नाच्या शोधात पाटणा अरण्याच्या हद्दीत शिरला. मात्र, रविवारी पुन्हा सिमलीपाल अभयअरण्यात परतत असताना या कळपातील लहान पिल्लू पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीत वाहून जाऊ लागले. त्यावेळी कळपातील इतर हत्तींनी आपल्या सोंडा एकत्र जोडून या पिल्लाला सुखरूप बेटावर आणले. पिल्लाला वाचवताना हत्तींचा कळप जोरदार प्रवाह असतानाही पाण्यातून बेटापर्यंत चालत गेला. मात्र, त्यानंतर हत्तींच्या कळपाने पुन्हा पाण्यात उतरण्याचा धोका न पत्कारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाण्याची पातळी सातत्याने वाढत गेल्यामुळे हत्तींचा कळप बेटावर अडकून पडल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ही घटना समजल्यानंतर स्थानिकांनी नदीच्या किनाऱ्यावर मोठी गर्दी केली. त्यामुळे हत्ती पुन्हा नदीच्या काठावर येण्यास बिचकत आहेत. काही स्थानिक लोक नदीतून पोहत जाऊन हत्तींना खाण्यासाठी बेटावर धान्य आणि नारळ पोहचवत आहेत. हत्तींना अशाप्रकारे यातना सोसताना बघणे अमानुष ठरेल. त्यामुळे गावकरी हरप्रकारे हत्तींच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. काही हत्तींनी सोमवारी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लोकांच्या गलक्यामुळे हत्ती पुन्हा माघारी परतले. नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हत्तींना नदी पार करता येईल, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा