लवकरच या देशात मुलांच्या सोशल नेटवर्किंग वापरावर येणार बंदी?
समाजमाध्यमांवर लहान मुलांवर होणारे अत्याचार आणि बालशोषण थांबवण्यासाठी लवकरच ब्रिटनमध्ये नवीन कायदा अस्तित्वात येणार आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये या महिन्याच्या अखेरीस एका नवीन कायद्याबद्दल चर्चा होणार आहे. समाज माध्यमांच्या व्यासपीठावरून वाढत्या बालशोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी १३ वर्षांखालील मुलामुलींना फेसबुक तसेच ट्विटर या दोन प्रमुख साईट्वर अकाऊण्ट सुरु करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.
‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सरकारने डेटा प्रोटेक्शन बिल या कायद्याच्या अंतर्गत समाज माध्यमांवर अकाऊण्ट सुरु करण्यासाठी वयाचे बंधन घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक राजकीय पक्षांनी युजर्सवर बंदी घालण्याऐवजी संबंधित कंपन्यांना त्यांच्या साईट्स तरुण युजर्सला अधिक सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने वापरता येण्याजोग्या बनवाव्यात, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे या कायद्याच्या बाजूने मते मिळण्यासाठी सरकारला कसरत करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ब्रिटनचे गृहसचिव अंबर रूड यांनी मागील आठवड्यामध्ये देशातील मोठ्या समाजमाध्यम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर या कायद्यासंदर्भातील हालचालींना वेग आला. ‘द सन’ या वृत्तपत्रासाठी रविवारी लिहिलेल्या एका लेखामध्ये अंबर यांनी समाज माध्यम कंपन्यांनी बाल शोषण थांबवण्यासाठी कठोर पावले उचलायला हवीत ही त्यांची नैतिक जबाबदारी असायला हवी असे मत व्यक्त केले.