पैशांच्या एटीएमबाबत आपण नेहमी ऐकतो पण तुम्हाला फूड एटीम संकल्पना माहितीये? अन्नाचेही एटीएम असू शकते. आता हे काय नवीनच…तर भारतातील मोठी लोकसंख्या आजही अन्नापासून वंचित आहे. अशांसाठी कोलकातामध्ये फूड एटीएम सुरु करण्यात आलं आहे. यासाठी ३२० लिटरचा एक रेफ्रिजरेटर घेण्यात आला असून यामध्ये अन्न ठेवण्यात येते. एका मोठ्या हॉटेलच्या मालकाने ३ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम सुरु केला आहे.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, नामांकित हॉटेलचे मालक आसिफ अहमद यांनी याबाबत माहिती दिली. दुकानांमध्ये वस्तू दिसण्यासाठी ज्याप्रमाणे पारदर्शक फ्रिज असतात त्यापद्धतीचा हा मोठ्या आकाराचा फ्रिज घेण्यात आला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना आग्रहाने हे सांगतो की त्यांचे उरलेले अन्न त्यांनी पॅकिंग करुन घेऊन या फ्रीजमध्ये ठेवावे. विशेष म्हणजे आमच्या हॉटेलशिवाय इतरही लोक या फ्रिजमध्ये अन्न ठेवण्यासाठी येतात. यामध्ये पोळी आणि बिर्याणी ठेवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ताजे अन्न देणारेही काही जण आहेत.

जी मुले कुपोषित आणि गरीब आहेत त्यांना हे जेवण दिले जाते. अतिशय अल्प मूल्यामध्ये म्हणजे केवळ ५ रुपयांमध्ये हे जेवण दिले जाते. अलोक आहार केंद्र असे या केंद्राचे नाव असून २७ जुलै रोजी ही सुविधा सुरु करण्यात आली. आतापर्यंत १५०० बालकांना अशापद्धतीने जेवण देण्यात आले आहे. या अन्नाची किंमत रहावी यासाठी आम्ही ५ रुपये हे मूल्य आकारले असल्याचे अहमद म्हणाले. आम्हाला या उपक्रमाचा आणखी विस्तार करायचा असून येत्या काळात त्यासाठीही प्रयत्न कऱण्यात येतील.

Story img Loader