झिका, डेंग्यू, मलेरिया यांसारखा रोग पसरवणा-या डासांनाच पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असताना चीनमध्ये मात्र लाखोंच्या संख्येने डासांची पैदास केली जात आहे. चीनमध्ये गाँगझोऊ येथे साडेतीन हजार चौरस फुटांवर ही प्रयोगशाळा आहे. यात डासांची पैदास केली जात आहे.
वाचा : …म्हणून चीन सर्वाधिक ‘गाढवं’ आयात करतो
गेल्या काही वर्षांपासून झिका वायरसमुळे हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. ब्राझील, चिली आणि अन्य ६० हून अधिक देशांत हा रोग झपाट्याने पसरत आहे. असे असताना या डासांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. पण त्यांना नष्ट करण्यापेक्षा चीनने काट्याने काटा काढण्याचा मार्ग अवलंबला आहे. एडिस एजिप्ती डासामुळे झिकाची लागवण होते. झिका विषाणू असलेला डास जर गर्भवती महिलेला चावला तर जन्माला येणाऱ्या मुलाचा मेंदू विकसित होण्यास अडथळा निर्माण होतो. या झिकामुळे आतापर्यंत हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
वाचा : ‘तिने’ केली त्याच्यासोबत ७०० किमीची पायी तीर्थयात्रा
एडिस एजिप्ती डासांची पैदास रोखण्यासाठी चीनने हा नवा प्रयोग करायला सुरूवात केली आहे. चीनच्या सन यत सेन विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ही डासांची फॅक्टरी आहे. या डासांची खास प्रकारे काळजीही घेतली जाते. मांसापासून तयार केलेल्या खास खाद्यावर डासांचे पोषण केले जाते. यातले फक्त नर डास शेजारच्या एका गावात सोडण्यात आले. या डासांमध्ये खास प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. हे नर डास जेव्हा जंगलातील मादा डासांच्या संपर्कात येतील तेव्हा त्यांच्यापासून कधीच डासांची उत्पत्ती होऊ शकत नाही. शिवाय त्यानंतर डासांची जातच हळूहळू नष्ट होऊन जाते असे या प्रयोगाचे मुख्य संशोधक झियांग झी यांचे म्हणणे आहे. शेजारच्या एका खेड्यामध्ये त्याने हा प्रयोग राबवला आहे. या प्रयोगातून अपेक्षित परिणम दिसून येत असल्याचे झी यांचे म्हणणे आहे. पण अर्थांतच त्यांच्या या प्रयोगावर अनेक वैज्ञानिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.