‘रस्त्यावर लहान मुलांना एकटे सोडू नका’ अशा सूचना वारंवार करुनही काही जण याकडे कानाडोळा करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ याचे उदाहरण आहे. घरच्यांच्या दुर्लक्षामुळे एक मुलगा आपली खेळण्यातली सायकल चालवत चक्क वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर पोहचला. पण दुर्दैव म्हणजे रस्त्यावर भरधाव वेगाने धावणा-या गाड्यांमधील एकाही चालकाला त्या मुलाला सुरक्षित बाजूला करावेसे वाटले नाही. हा मुलगा मात्र खेळण्याच्या नादात रस्त्यावरून आपली गाडी चालवतच राहिला. एका ठिकाणी तर तो अपघात होता होता थोडक्यात बचावला. चीनच्या रस्त्यावरील हा व्हिडिओ आहे.

नागरिकांच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनच्या ‘सीसीटीव्ही’ न्यूजने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच नेटीझन्सकडून अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. रस्त्यावर वाहतूकीचे नियंत्रण करण्यासाठी ठिकाठिकाणी वाहतूक पोलिस असतात, असे असताना सायकल घेऊन हा लहानगा रस्त्यावर पोहचलाच कसा असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. पण दुसरीकडे या मुलाकडे दुर्लक्ष करून पुढे जाणा-या नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यावरही टीका होत आहे. ब-याच वेळाने वाहतुक पोलिसांचे लक्ष त्याच्यावर गेल्याने पोलिसाने या मुलाला रस्त्यावरून सुरक्षित ठिकाणी नेले. चीनमध्ये दरवर्षी रस्ते अपघातात १० हजार मुले मारली जातात. यासारख्या सीसीटीव्ही फुटेजमुळे मुलांच्या सुरक्षेवर आणि वाहतुक व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.