लग्नाआधी ‘प्री वेडिंग फोटोशूट’ करण्याचा हल्ली ट्रेंड आला आहे. लग्नाआधीचे सुंदर क्षण कायमस्वरुपी लक्षात राहावेत, यासाठी ‘प्री-वेडिंग’ फोटोशूट केले जाते. परंतु मध्यप्रदेशमध्ये ‘प्री वेडिंग फोटोशूट’ करण्याची एक अजबच संकल्पना रुजू लागली आहे. येथील मुलांना लग्न करण्याआधी चक्क त्यांच्या घरातील शौचालयात उभे राहून छायाचित्र काढावे लागत आहे.
मध्यप्रदेश सरकारने तेथील मुलींसाठी ‘मुख्यमंत्री विवाह योजना’ सुरु केली. या योजनेअंतर्गत तेथील मुलींना लग्नासाठी सरकारतर्फे ५१ हजार रुपयांचा निधी दिला जातो. परंतु या योजनेत एक अट आहे. जर हा निधी मिळवायचा असेल, तर मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याने त्याचा शौचालयासोबतचा सेल्फी काढून तो लाभार्थी अर्जाला जोडावा लागतो.
नवऱ्या मुलाने त्याचा शौचालयात उभा असलेला सेल्फी काढण्याचा नियम केवळ ग्रामीण भागात नसून, भोपाळ महानगरपालिकेकडूनही या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. याआधी २०१३ साली आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी मध्य प्रदेश सरकारच्या वतीने ‘मुख्यमंत्री विवाह योजना’ जाहीर करण्यात आली होती. मात्र, छायाचित्राचा नियम अलीकडे लागू करण्यात आला आहे. अर्थात हे नव्या पद्धतीचे फोटो शूट लग्नाआधीचे सुंदर क्षण टिपण्यासाठी केल्या जाणाऱ्या फोटोशूट सारखे नसले, तरी सोशल मीडियावर मात्र, ‘प्री वेडिंग फोटोशूट’ म्हणूनच हा नवा प्रकार चर्चेत आहे.