Tomato Z+ Security: भारतात अचानक टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले आहेत. खरंतर जेवढं कांदा दरवाढीने रडवलं नव्हतं तितकं टोमॅटोने टेन्शन वाढवलं आहे असेही अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. मॅकडॉनल्ड्समध्ये तर वधारलेले भाव पाहता बर्गरमध्ये टोमॅटो न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच यामुळे ग्राहकांइतकेच भाजी विक्रेते सुद्धा अडचणीत आले आहेत. टोमॅटोच्या दरवाढी इतकीच चिंता टोमॅटो चोरांची वाटत असल्याचे एक विक्रेते सांगत आहेत. अनेकांना भाजी घ्यायला गेल्यावर एखादा टोमॅटो उचलून भाजीच्या पिशवीत टाकण्याची सवय असते अर्थात यात काही चोरी करण्याचा उद्देश नसला तरीही विशेषतः भाव वाढलेल्या परिस्थितीत यामुळे भाजी विक्रेत्याला फटकाच बसू शकतो. हीच सवय वजा चोरी टाळण्यासाठी एका भाजी विक्रेत्याने भलताच जुगाड केला आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजी विक्रेत्याच्या जुगाडाचा व्हिडीओ शेअर करत भाजपाने आता टोमॅटोला सुद्धा झेड प्लस सुरक्षा द्यायला हवी अशी गमतीशीर मागणी केली आहे. पीटीआयच्या माहितीनुसार सदर भाजी विक्रेता हा समाजवादी पक्षाचा प्रतिनिधी असल्याचे समजत आहे.
वाराणसीमध्ये एका भाजी विक्रेत्याने चक्क टोमॅटोच्या रक्षणासाठी बाउन्सर नियुक्त केल्याची चर्चा आहे. विक्रेता अजय फौजी यांनी सांगितले की, टोमॅटोची किंमत प्रचंड वाढली आहे. अनेक ठिकाणी यावरून मारहाण व चोरीचे प्रकार समोर आले होते, मी माझ्या दुकानात विकण्यासाठी टोमॅटो मागवले होते. आता त्यावरून वाद होऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेतली आहे.
पीटीआयच्या माहितीनुसार, अजय फौजी या दुकानदाराने टोमॅटोच्या दरवाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोष देत म्हटले की, “मोदींच्या राज्यात सर्वच त्रस्त आहेत. १६० रुपये किलो टोमॅटो विकत असताना लोकं फक्त ५० व १०० ग्रॅम टोमॅटोचं खरेदी करत आहेत.” दुसरीकडे बाउन्सर असतानाही अजय हे भाज्यांची चांगलीच काळजी घेत आहेत. त्यांनी ग्राहकांना टोमॅटो विकत घेण्याआधी पैसे देण्याचे आवाहन केले आहे तर दुकानावर बोर्ड लावून टोमॅटो व मिरचीला हात लावू नका अशा सूचनाही दिल्या आहेत.
हे ही वाचा<< मॅकडोनाल्ड्सच्या बर्गर व रॅपमध्ये मोठा बदल; सोशल मीडियावर व्हायरल झालं कंपनीचं निवेदन
दरम्यान, यापूर्वी प्रयागराजमध्ये दुकानात १० रुपयाचे टोमॅटो खरेदी करायला गेलेल्या ग्राहकाला दुकानदार महिलेने नकार दिल्याने ग्राहकाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता.