Traffic Index ranking : वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या वाढतेय. परिणामी अनेक शहरांमध्ये लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. भारताचा विचार केल्यास मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली अशी अनेक शहरे वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत आघाडीवर आहेत. पण, केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक शहरांमध्ये हीच स्थिती आहे. अशा परिस्थितीत डच जियोलोकेशन टेक्नोलॉजी फर्म टॉमटॉमने जगभरातील अनेक देशांमधील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत एक अहवाल सादर केला आहे. ज्या अहवालानुसार, भारतातील टेक कॅपिटल म्हणून ओळख असणारे बंगळुरू हे शहर जगातील वाहतूक कोंडीच्या समस्येत सहाव्या स्थानी आहे. या अहवालात विविध देशांतील शहरांमधील वाहतूक कोंडीच्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर त्या प्रत्येक शहरातील वाहनाचा सरासरी वेग, प्रवासाचा वेळ आणि वाहतूक कोंडीचा स्तरदेखील सांगण्यात आला आहे.
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने ६ खंडातील ५५ देशांमधील ३८७ शहरांमधील प्रवासाचा सरासरी वेळ, इंधन खर्च आणि CO2 उत्सर्जनावर आधारित मूल्यांकन केले आहे. हा अहवाल ६०० दशलक्षाहून अधिक इन-कार नेव्हिगेशन सिस्टम आणि स्मार्टफोनवर आधारित आहे. प्रत्येक शहरासाठी टॉमटॉमने २०२३ मध्ये संपूर्ण नेटवर्कवर लाखो किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपासून प्रति किलोमीटरसाठी लागणारा सरासरी प्रवास वेळ काढला.
बंगळुरू, पुण्यात वाहतूक कोंडीची भयंकर स्थिती
या अहवालात भारतातील दोन शहरांची नावे टॉप १० मध्ये आहेत. २०२३ च्या वाहतूक कोंडीच्या समस्येत भारतातील बंगळुरू हे सहाव्या क्रमांकावर आणि पुणे सातव्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये बंगळुरूमध्ये प्रति १० किलोमीटर प्रवासासाठी सरासरी २० मिनिटे १० सेकंद इतका वेळ लागत होता, तर पुण्यात याच अंतरासाठी २७ मिनिटे ५० सेकंद इतका वेळ लागला.
दरम्यान, या अहवालात २०२२ मध्ये बंगळुरू दुसऱ्या स्थानावर होते, पण २०२३ मध्ये बंगळुरू ट्रॅफिकच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे.
खाताना घश्यात अडकला घास अन् गुदमरला चिमुकलीचा जीव; आर्मी जवानाने असे वाचवले प्राण
दिल्ली आणि मुंबईत काय स्थिती?
या यादीत दिल्ली ४४ व्या, तर मुंबई ५३ व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार २०२३ मध्ये दिल्लीमध्ये प्रति १० किलोमीटर प्रवासासाठी सरासरी २१ मिनिटे ४० सेकंद इतका वेळ लागतोय, तर मुंबईत २१ मिनिटे २० सेकंद इतका वेळ लागत आहे.
पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर जगातील ‘ही’ शहरं
अहवालानुसार या यादीत लंडन सर्वात आघाडीवर आहे. लंडन हे ट्रॅफिक समस्येच्या बाबतीत पहिल्या स्थानी आहे. इथे प्रति १० किलोमीटर प्रवासासाठी सरासरी ३७ मिनिटे इतका वेळ लागत आहे, तर डब्लिनमध्ये प्रति १० किलोमीटरसाठी २९ मिनिटे ३० सेकंद इतका सरासरी वेळ लागत आहे. या यादीत डब्लिनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर तिसऱ्या स्थानी कॅनडातील टोरंटो शहराचे नाव आहे, जिथे प्रति १० किलोमीटर प्रवासासाठी सरासरी २९ मिनिटे इतका वेळ लागत आहे.